![]()
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या सर्व चर्चा ‘केवळ दंतकथा’ असल्याचे म्हणत, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. “राष्ट्रवादीचा दुसरा जो गट आहे (अजित पवार गट), तो अमित शहांचा गट आहे आणि त्यांच्यासोबत शरद पवार जाणार नाहीत,” असा दावा राऊत यांनी केला आहे. ‘कमिटीच्या बैठकीत विलीनीकरणाची चर्चा शक्य आहे का?’ राऊत म्हणाले, संसदीय कार्य समितीच्या बैठकीत अनेक लोक एकत्र काम करतात. या कमिटीचे अध्यक्ष अमित शहा आहेत आणि मी पण त्या कमिटीवर आहे. म्हणून काय माझी अमित शहांशी विलीनीकरणावर बैठक होणार आहे का? बैठकीत ४०-४५ लोक असतात. तिथे कमिटीच्या अजेंड्यावर काम चालते. सकाळी ११ ते ५ चालणाऱ्या या बैठकीत तुम्ही विलीनीकरणावर चर्चा करणार, असे कधी शक्य असते का?” ‘विलीनीकरण ही दंतकथा, एक-दोन दिवसांत द एन्ड होईल’ राऊत म्हणाले, “हे विलीनीकरण वगैरे सगळं दंतकथा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे, ती म्हणजे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालची. दुसरा जो गट आहे तो अमित शहा यांचा गट आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील ज्या विचारधारेतून काम करतात, त्या विचारधारेत अमित शहा यांचा गट कुठेही बसत नाही. त्यामुळे ही दंतकथा एक-दोन दिवसांत संपून जाईल, द एन्ड होईल. यातून मविआत संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे.” विलीनीकरणाच्या या बातम्या सलीम-जावेद यांच्या ‘शोले’, ‘दिवार’ यांसारख्या स्टोरी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विधानांबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, “मी त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता नाही. प्रफुल्ल पटेलांचे डायलॉग अमित शहांसोबत जास्त असतात. पण महाविकास आघाडीत पवार साहेबांचा पक्ष असल्याने आम्ही यावर बोलतो. पवार साहेबांची आणि त्यांच्या कुटुंबाची भूमिका पाहता या दंतकथेचा आता शेवट आलेला आहे.” पंतप्रधान मोदींवर घणाघात राऊत म्हणाले, “त्या महिला पत्रकाराने पंतप्रधान मोदींना विदेशात पत्रकार परिषद का घेत नाही, असा प्रश्न विचारला होता. भारत हा महान लोकशाहीवादी देश आहे, आणि इथले पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत. त्या पत्रकाराने यावर चिंता व्यक्त केली होती. त्याचाच राग असल्यामुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. यातून हेच दिसते की, एका महिला पत्रकाराला ५६ इंचाची छाती वाले पंतप्रधान आणि गृहमंत्री घाबरतात. ——————- हेही वाचा.. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम: विलीनीकरणाची तारीखही ठरली होती, दादांसोबत चर्चा झाली होती- सुप्रिया सुळेंचा खुलासा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या विलीनीकरणाच्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती, अगदी तारीखही ठरली होती. पण ज्या दिवशी दादा गेला, त्या दिवशी माझ्या मनात आणि पक्षामध्ये या विलीनीकरणाला कायमचा ‘फुलस्टॉप’ मिळाला आहे,” असे स्पष्ट विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सविस्तर वाचा
Source link
विलीनीकरण ही दंतकथा आहे, 2-3 दिवसात संपून जाईल:संजय राऊतांचा दावा; म्हणाले- शरद पवारांची राष्ट्रवादीच खरी, दुसरा गट अमित शहांचा