![]()
ऊस दराच्या पहिल्या उचलीवरून सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अखेर तीन दिवसांसाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबरला पालकमंत्री आणि कारखानदारांसोबत बैठक आयोजित केली असून, तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने राजू शेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, “जर या बैठकीत कारखानदारांनी आमची फसवणूक केली, तर त्यांना बाहेर पडू देणार नाही आणि महामार्ग तसेच रेल्वेही रोखू,” असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. काय होती मागणी? आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी म्हणाले, “कारखाने सुरू होऊन दीड महिना झाला तरी कारखानदार दराबाबत बोलायला तयार नव्हते. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील फॉर्म्युल्यानुसार, तसेच सोलापूर जिल्ह्याची साखरेची रिकव्हरी पाहता, आम्ही ३,५०० रुपये ही पहिली उचल अतिशय रास्तपणे मागितली होती. कर्नाटकात शेजारचे कारखाने ३,७०० रुपये देत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी साखळी करून केवळ ३,००० ते ३,१०० रुपये देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला होता.” आंदोलन स्थगित का केले? बुधवारी संतप्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते, मात्र शेट्टी यांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना शांत केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून १९ नोव्हेंबर रोजी कारखानदार, शेतकरी प्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांची बैठक लावली. यावर बोलताना शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांनी विनाकारण तीन दिवस रस्त्यावर बसून राहणे योग्य वाटत नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मधला मार्ग काढत, तीन दिवस कारखाने बंद ठेवण्याचे आदेश काढले. प्रशासनाने आमचा मान राखल्याने आणि शेतकऱ्यांची रस्त्यावरील गैरसोय टाळण्यासाठी आम्ही हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.” “कारखानदारांनी फसवलं तर…” पुढील दिशेबाबत बोलताना शेट्टी यांनी प्रशासनाला आणि कारखानदारांना दम भरला. “आम्ही जिल्हाधिकारी आणि कमिशनर यांना स्पष्ट सांगितले आहे की, १९ तारखेला जर या कारखानदारांनी आमची फसवणूक केली, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल. कार्तिक वारीच्या निमित्ताने जिल्ह्यात भाविक येणार आहेत, अशावेळी पोलिसांवर ताण पडेल. पण आमची फसवणूक झाली तर आम्ही गप्प बसणार नाही. जर कारखानदारांनी फसवलं, तर त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेरच पडू द्यायचे नाही, असा आमचा निर्णय आहे. गरज पडल्यास राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेही रोखू,” असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ———- हेही वाचा.. माकपचा सोलापूर ते मुंबई ‘लाँग मार्च’ स्थगित:येत्या 31 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडकणार रेनगरमध्ये पायाभूत सुविधांसाठी २५० कोटी रुपये मंजूर करावेत, विडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करावी आणि असंघटित कामगारांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी सोलापूर ते मुंबई पायी लाँग मार्च पुकारला होता. त्यासाठी सोमवारी डॉ. आंबेडकर चौकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा घेऊन कामगार मोठ्या संख्येने जमले. कामगारांची ही तयारी पाहून जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत सर्व मागण्यांवर बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांनी लाँग मार्च तात्पुरता स्थगित केल्याचे जाहीर केले; मात्र ३१ डिसेंबरपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडकण्याचा इशाराही दिला. सविस्तर वाचा
Source link
सोलापुरातील स्वाभिमानीचे ऊस दर आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित:19 तारखेच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखू, राजू शेट्टींचा इशारा