![]()
पुण्यात धनकवडीतील श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती आणि सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीतील सहा खाद्य आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत ही कारवाई केली. विनापरवाना व्यवसाय, उघड्यावर ठेवलेले अन्न आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन ही कारवाईची कारणे आहेत. धनकवडीतील के. के. मार्केटजवळ असलेल्या अन्नछत्राची अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. सोनकांबळे यांनी 16 नोव्हेंबरला तपासणी केली. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळले. स्वच्छतेबाबतही त्रुटी आढळल्या. त्यानंतर सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी नि. ब. खोसे यांनी अन्नछत्राचा व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्रुटी दूर करून वैध परवाना किंवा नोंदणी मिळेपर्यंत व्यवसाय सुरू करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील गोयल गंगा इमारतीसमोरील खाऊ गल्लीत 17 नोव्हेंबरला विशेष तपासणी झाली. ‘ईट राईट स्ट्रीट’ उपक्रमांतर्गत नऊ खाद्य आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी सहा आस्थापनांकडे वैध अन्न परवाना किंवा नोंदणी नव्हती. या आस्थापनांमध्ये नीलंका राईस सेंटर, पुणेरी अंडा भुर्जी सेंटर, वृंदावन डाळ खिचडी, अमृत वडेवाले, ओम साई राम टी सेंटर कॉर्नर आणि नॅचरल फ्रेश ज्यूस सेंटर यांचा समावेश आहे. तपासणीत तयार अन्न उघड्यावर ठेवणे, अस्वच्छ अॅप्रन आणि हातमोजे, कामगारांच्या वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रांचा अभाव, उघड्या कचराकुंड्या आणि सांडपाण्याचा अयोग्य निचरा अशा त्रुटी आढळल्या. तयार खाद्यपदार्थांमध्ये रंगांचा वापर होत असल्याचेही दिसले. सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि पदनिर्देशित अधिकारी एन. आर. सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एन. एस. मोहिते आणि के. व्ही. बारवकर यांनी कारवाई केली. नियमांची पूर्तता करून वैध परवाना मिळेपर्यंत संबंधित आस्थापनांना व्यवसाय सुरू करता येणार नाही, असे प्रशासनाने सांगितले.
Source link
पुण्यात अन्नछत्र आणि सहा दुकाने बंद:विनापरवाना व्यवसाय, उघड्यावर अन्न आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन; ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत कारवाई