![]()
गेल्या पाच वर्षांत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून, येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत आहेत. नगर जिल्हा आता खऱ्या अर्थाने ‘कबड्डीची पंढरी’ बनला आहे, असे गौरवद्गार महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी काढले. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पुरुष, कुमार व कुमारी गटातील यशस्वी संघांचा गौरव सोहळा रविवारी शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार दादा कळमकर होते. व्यासपीठावर राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे, ज्येष्ठ समालोचक राणाप्रताप तिवारी, जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, संपतराव भोसले, सचिन भोसले, जिल्हा सचिव प्रा. शशिकांत गाडे, विजयसिंह मिस्कीन, गोविंद भुजबळ, मुकेश मुळे उपस्थित होते. कीर्तीकर म्हणाले, कबड्डी खेळाला खऱ्या अर्थाने नावारूपास आणण्याचे काम नगर जिल्ह्याने केले आहे. मात्र, आजही या खेळाला हवा तसा राजाश्रय मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नगरमधील उद्योजकांनी खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य पातळीवर घवघवीत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा स्मृतीचिन्ह व ट्रॅकसूट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्ह्यात होणारी पारदर्शक निवड प्रक्रिया हेच नगरच्या यशाचे गमक आहे. यामुळेच आपला संघ सलग पाचवेळा राज्याच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. लवकरच नगरचे तीन खेळाडू भारतीय संघात खेळताना दिसतील, असा विश्वास सचिव प्रा. शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला. तसेच क्रीडा अकॅडमीसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे म्हणाले, वाडिया पार्क क्रीडा संकुलासाठी ५२ कोटी रुपयांचा आराखडा तयार असून, त्यातील १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून कबड्डीसाठी अत्याधुनिक ‘इनडोअर’ मैदान साकारण्यात येणार आहे. वाडिया पार्कवर कबड्डीचे इनडोअर मैदान : क्रीडाधिकारी खुरांगे
Source link
अहिल्यानगर जिल्हा आता कबड्डीची पंढरी- कीर्तीकर:अहिल्यानगरच्या खेळाडूंचे कौतुक; राज्यस्तरीय विजेत्यांचा सत्कार, आता "टीम इंडिया''चे वेध