![]()
व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिकेच्या नावाने पाठवलेली अँड्रॉइड ॲपची फाइल इन्स्टॉल केल्यास मोबाइलमधील वैयक्तिक माहिती आणि बँकिंग तपशील सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकतात. त्यामुळे अनोळखी ॲप इन्स्टॉल करू नका, असा इशारा सायबर तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला आहे. ‘आमच्या लग्नाला नक्की या, पत्रिका सोबत पाठवली आहे’, असा संदेश पाठवून त्यासोबत ॲप इन्स्टॉल करण्याची फाइल दिली जाते. लग्नपत्रिका पाहण्याच्या उत्सुकतेतून कोणी ती फाइल इन्स्टॉल केल्यास मोबाइलमधील संदेश, वैयक्तिक माहिती आणि बँकिंग तपशील चोरीला जाण्याचा धोका असतो. या फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार ‘एपीके’ फाइल वापरतात. फाइलच्या नावात लग्नपत्रिका किंवा विवाह सोहळ्याशी संबंधित शब्द असल्याने ती खरी पत्रिका असल्याचा भास होतो. मात्र, फाइलच्या शेवटी असलेले ‘.apk’ हे अँड्रॉइड फोनवर ॲप इन्स्टॉल करण्याची फाइल असल्याचे दर्शवते. फाइल उघडल्यानंतर मोबाइलवर ॲप इन्स्टॉल करण्याची सूचना येते. वापरकर्त्याने परवानगी दिल्यास घातक ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल होऊ शकते. या ॲपला संदेश वाचण्यासह विविध परवानग्या दिल्यास त्यांचा गैरवापर होऊ शकतो. बँकेकडून आलेले ओटीपी, वैयक्तिक संदेश आणि इतर संवेदनशील माहिती गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकते. त्याद्वारे बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार करून पैसे काढले जाऊ शकतात. त्यामुळे ॲप इन्स्टॉल करणे आणि त्याला परवानग्या देणे, दोन्ही धोकादायक ठरू शकतात. लग्नपत्रिका पाहण्यासाठी कोणत्याही ॲपला संदेश वाचण्याची किंवा बँकिंग माहितीची परवानगी देण्याची गरज नसते. ओळखीच्या व्यक्तीकडून संदेश आला तरी फाइलची खातरजमा करा. त्या व्यक्तीला तिच्या नेहमीच्या मोबाइल क्रमांकावर फोन करून विचारा. शक्यतो पत्रिका फोटो किंवा पीडीएफ स्वरूपात मागवा. चुकून घातक ॲप इन्स्टॉल झाल्यास मोबाइल डेटा आणि वाय-फाय तातडीने बंद करा. दुसऱ्या सुरक्षित उपकरणावरून बँकेशी संपर्क साधून माहिती द्या. संशयित ॲप काढून टाका आणि गुगल प्ले प्रोटेक्टच्या मदतीने मोबाइल तपासा. सुरक्षित उपकरणावरून बँकिंगचे पासवर्ड बदला. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यास लगेच बँकेला कळवा आणि १९३० या सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइनवर संपर्क साधा. राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवा. व्यवहारांचे तपशील आणि संशयित संदेशाचे स्क्रीनशॉट जतन करा.
Source link
व्हॉट्सॲपवरील लग्नपत्रिकेच्या नावाने घातक ॲप पाठवले:फाइल इन्स्टॉल केल्यास मोबाइलमधील माहिती आणि बँक खात्याला धोका; सायबर तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा इशारा