![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची अध्यक्षपदी, तर शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निकालाच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा हिशोब चुकता केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी बँकेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत भाजपला बाजूला सारून जयकुमार गोरे यांना राजकीय शह दिला. बँकेत 2 पदे असल्याने महायुतीतील 2 पक्षांनाच संधी मिळणार, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे शांतपणे बाहेर आले. प्रसारमाध्यमांनी वचपा काढल्याच्या चर्चांबाबत विचारले असता, त्यांनी नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. बँकेवर महायुतीचाच अध्यक्ष झाला असून, ज्यांच्याकडे बहुमत होते त्यांचा उमेदवार निवडून आला आहे. जिल्हा परिषद निवडणूक आम्ही वेगळी लढलो होतो, तर ही निवडणूक एकत्र लढलो आहोत, असे ते म्हणाले. तसेच, सत्तावाटपाच्या चर्चेत आपण नव्हतो, त्यामध्ये शिवेंद्रराजे सहभागी होते, त्यामुळे त्या फॉर्म्युल्याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचेही गोरे यांनी नमूद केले. भाजपचा कार्यकर्ता असल्याने आपल्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा अशी आपली इच्छा असणे स्वाभाविक होते आणि आपण कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले. त्यांनी नूतन चेअरमन उदयसिंह उंडाळकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात बँक उत्तम प्रकारे चालावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नाही. कोणतीही निवडणूक अंतिम नसते, असे म्हणत त्यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’, असा सूचक इशाराही विरोधकांना दिला.
Source link
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का:राष्ट्रवादीचे उदयसिंह उंडाळकर अध्यक्ष, तर शिवसेनेचे दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी बिनविरोध