![]()
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला सातत्याने कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांचे हे आक्रमक हल्ले सुरू असताना सरकारच्या बचावासाठी मंत्री विशेष पुढाकार घेताना दिसत नसल्याने, केवळ पक्षाच्या प्रवक्त्यांनाच एकहाती खिंड लढवावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आता या गंभीर विषयाची दखल घेत आपल्या मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी पक्षाच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांच्या नॅरेटिव्हकडे दुर्लक्ष करु नका. मंत्र्यांनी सुद्धा विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तरं दिली पाहिजेत, असे रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत बजावले. बैठकीत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, विरोधकांडून सरकारची प्रतिमा मलिन केली जात असताना थेट मंत्र्यांनी गप्प बसू नये. मंत्री गप्प राहिल्यास जनतेच्या मनात विरोधकांकडून होणारे आरोप खरे आहेत, असा समज होऊ शकतो. गेल्या काही काळात अनेक प्रकल्प, शेतकऱ्यांना देण्यात आलेली अग्रीम रक्कम या मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. मात्र, त्यानंतर सराकरमधील मंत्र्यांनी या टीकेचा म्हणावा तसा प्रतिवाद केला नाही. त्यामुळे आता भाजपने आपल्या सर्व मंत्र्यांना कामाला लावण्याचे ठरवले आहे. विरोधकांच्या टीकेला अनेकदा मंत्री उत्तरच देत नाहीत. विरोधकांना उत्तर देणे ही फक्त पक्षाच्या प्रवक्त्यांची जबाबदारी नाही. मंत्र्यांनीही विरोधकांना उत्तर दिले पाहिजे. प्रवक्त्यांसोबतच मंत्र्यांकडून सरकारच्या समर्थनार्थ ठोस भूमिका मांडली गेली पाहिजे, अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत. मुंबईतील संघटनात्मक खांदेपालटाचे संकेत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. पक्ष संघटनेत अंतर्गत बदल करण्याच्या हालचालींना वेग आला असून, विभागप्रमुखांपासून ते शाखाध्यक्षांपर्यंत मोठा खांदेपालट होणार असल्याचे समजते. या मोहिमेअंतर्गत अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पदावरून उचलबांगडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नगरसेवकांच्या कामगिरीवर नाराजी प्राप्त माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे मुंबईतील काही नगरसेवकांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कामगिरी न करणाऱ्या या नगरसेवकांना शिंदे यांच्याकडून योग्य ती समज दिली जाणार आहे. याशिवाय, मुंबईतील पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी नव्या पदांची निर्मिती करण्याचाही विचार सुरू असून, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजते.
Source link
विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या:मंत्र्यांनीही सरकारच्या बचावासाठी मैदानात उतरावे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या सूचना