![]()
पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष, अघोरी पूजा आणि नरबळी दिल्याचा गंभीर आरोप… अकोल्यातील एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातून दोन दिवसांत परत येतो, असे सांगून मित्रांसोबत बाहेर पडलेल्या हेमंत प्रफुल्ल सपकाळ याचा मृतदेह कुटुंबीयांच्या हाती आला. मध्य प्रदेशातील इंदूर येथे पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करण्यात आली आणि त्यासाठी हेमंतचा नरबळी देण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात विवेक ऊर्फ विक्की शिंदे नामक मांत्रिकावर संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार हा प्रकार घडल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. राज्यात यापूर्वीही भोंदूबाबा आणि अघोरी विद्येच्या नावाखाली फसवणूक केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच अकोल्यातील या घटनेने पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, मृत्यूच्या काही तास आधी हेमंतने आपल्या भावाला फोन करून जीवाला धोका असल्याचे सांगितल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दोन दिवसांत परत येतो सांगून घरातून निघाला मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत प्रफुल्ल सपकाळ हा 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. विवेक ऊर्फ विक्की शिंदे, अजय गायकवाड आणि अन्य एका व्यक्तीसोबत तो बाहेर जात असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. हे तिघेही अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला हेमंत अमरावतीला जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर कुटुंबीयांचा त्याच्याशी मोबाईलवरून नियमित संपर्क सुरू होता. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्याचे कुटुंबीयांशी बोलणे झाले. त्यावेळी दुसऱ्या दिवशी घरी येणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीयांना तो लवकरच परत येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी आलेल्या एका फोनने संपूर्ण कुटुंब हादरून गेले. ‘माझा जीव धोक्यात आहे, मला वाचवा’ 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी हेमंतने आपल्या भावाला फोन केला. यावेळी त्याने आपला जीव धोक्यात असल्याचे सांगत मदतीची विनंती केली. ‘हे लोक मला आज रात्री मारणार आहेत. मला वाचवा,’ असे तो भावाला म्हणाल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. आपण इंदूरमध्ये असल्याचेही त्याने सांगितले. आपण स्वतःहून इंदूरला आलो नसून, संबंधित लोक आपल्याला तिथे घेऊन आल्याचे त्याने भावाला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. फोनवरील संभाषणादरम्यान हेमंतने आपण संबंधित व्यक्तींपासून दूर असल्याचे सांगितले. मात्र, विवेक ऊर्फ विक्की शिंदे वारंवार फोन करून आपल्याला बोलावत असल्याचेही त्याने भावाला कळवले. यावेळी कुटुंबीयांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत तिथे जाऊ नकोस, असा सल्ला दिला. मात्र, त्यानंतर हेमंतचा मोबाईल बंद झाला आणि कुटुंबीयांचा त्याच्याशी संपर्क तुटला. विक्कीने रेल्वेत असल्याचे सांगितले; दुसऱ्या दिवशी मृत्यूची बातमी हेमंतचा फोन बंद झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री सुमारे 12 वाजता त्याच्या भावाने विवेक ऊर्फ विक्की शिंदे याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आपण रेल्वेमध्ये असल्याचे आणि हेमंत मागील डब्यात असल्याचे विक्कीने सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता हेमंतचा मोबाईल पुन्हा सुरू झाला. त्याच्या भावाने त्या क्रमांकावर फोन केला असता, पलीकडून पोलिसांनी उत्तर दिले. हेमंतच्या मृत्यूची माहिती देत कुटुंबीयांना इंदूरमधील एम.जी. रोड पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले. ही बातमी समजताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर नातेवाईक इंदूरला पोहोचले. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी नरबळी दिल्याचा आरोप हेमंतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. विवेक ऊर्फ विक्की शिंदे नामक मांत्रिकाच्या सांगण्यावरून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करण्यात आली. या पूजेदरम्यान पैशाच्या हव्यासापोटी हेमंतचा नरबळी देण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा आरोप असून त्याला अद्याप तपासातून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेनंतर हेमंतच्या आईने केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. दोन दिवसांत घरी परत येईल, अशी अपेक्षा असलेला मुलगा मृतावस्थेत परतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मांत्रिकाच्या अघोरी पूजेचे जुने व्हिडिओ समोर या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या विक्की नामक मांत्रिकाचे अघोरी पूजेचे काही जुने व्हिडिओही समोर आल्याची माहिती आहे. या व्हिडिओंमध्ये तो पूजेदरम्यान लिंबू हवेत उचलल्याचा आभास निर्माण करताना दिसतो. तसेच उपस्थित लोकांना घाबरू नका, असे सांगतानाही तो दिसत आहे. या कथित चमत्कारांच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव निर्माण केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अशा प्रकारचे चमत्कार दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून चौकशीची मागणी या घटनेवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही प्रतिक्रिया दिली आहे. समितीचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. मांत्रिकांकडून अघोरी विद्येच्या नावाखाली लिंबू हवेत उडवणे किंवा अशा प्रकारच्या हातचलाखीच्या युक्त्या वापरून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जाते. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणारा लिंबू हवेत उडवण्याचा प्रकारही एक युक्ती असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अकोला आणि इंदूर पोलिसांकडून तपास हेमंतच्या भावाने या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, इंदूरमधील एम.जी. रोड पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. हेमंतचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, त्याला इंदूरला कोण घेऊन गेले, अघोरी पूजेचा या मृत्यूशी काही संबंध आहे का आणि कुटुंबीयांनी केलेल्या नरबळीच्या आरोपात तथ्य आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन दिवसांसाठी घराबाहेर पडलेल्या हेमंतचा मृतदेहच परतल्याने सपकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली खरंच अघोरी विधी करण्यात आले होते का, या प्रकरणामागे नेमके काय घडले, याचा उलगडा आता पोलीस तपासातूनच होणार आहे. हेही वाचा…. पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड:बॅटरी लो झाल्याने इंजिन सुरू होईना, अखेर कारने पुण्याकडे रवाना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. कार्तिकी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. दौऱ्यातील कार्यक्रम आणि पाहणी पूर्ण करून ते मुंबईला परतण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले. मात्र, हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. हेलिकॉप्टरची बॅटरी लो झाल्यामुळे त्याचे दुसरे इंजिन सुरू होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांचा हेलिकॉप्टरने मुंबईला जाण्याचा नियोजित प्रवास रद्द करावा लागला. अखेर एकनाथ शिंदे यांनी कारने पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. पुणे विमानतळावरून विमानाने ते मुंबईला रवाना होणार आहेत. सविस्तर वाचा….
Source link
पैशाचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेचा संशय:घरातून गेलेल्या तरुणाचा मृतदेहच परतला, नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप