Headlines

सावरकरांच्या सन्मानार्थ शिवसेना आक्रमक:मालाड पूर्वेत संजय निरुपम यांचे आंदोलन, सोनिया गांधींचे पोस्टर फाडून निषेध




स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित अवमानाच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. सावरकरांच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या वतीने मालाड पूर्व येथे आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील सावरकर यांच्याविषयीच्या कथित आक्षेपार्ह उल्लेखांचा निषेध करण्यात आला. यावेळी सोनिया गांधी यांचे पोस्टर फाडून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेच्या वतीने काल पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आता मालाड पूर्व येथे आंदोलन करत शिवसेनेने आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. सावरकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य किंवा मजकूर खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला. या आंदोलनादरम्यान संजय निरुपम यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आंदोलनाची आठवण करून दिली. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्यावेळी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात अय्यर यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला होता, असे निरुपम यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या आंदोलनाचे जुने छायाचित्रही दाखवण्यात आले. तसेच मणिशंकर अय्यर यांचे छायाचित्र फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह भूमिका घेणाऱ्यांना शिवसेना जशास तसे उत्तर देईल, असा आक्रमक संदेश या आंदोलनातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या मुद्द्यावरून संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटावरही निशाणा साधला. सावरकरांच्या मुद्द्यावरून उबाठा गटाकडून चुकीचे संदेश पसरवले जात असून, त्यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सावरकरांच्या सन्मानाचा प्रश्न हा केवळ राजकीय नसून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाशी संबंधित असल्याची भूमिका शिवसेनेने मांडली. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील कथित उल्लेख, मणिशंकर अय्यर यांचे जुने वक्तव्य आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी केलेले आंदोलन या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून शिवसेनेने मालाडमध्ये आंदोलन केले. या आंदोलनामुळे सावरकरांच्या कथित अवमानाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
हेही वाचा…. पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड:बॅटरी लो झाल्याने इंजिन सुरू होईना, अखेर कारने पुण्याकडे रवाना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. कार्तिकी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. दौऱ्यातील कार्यक्रम आणि पाहणी पूर्ण करून ते मुंबईला परतण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले. मात्र, हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. हेलिकॉप्टरची बॅटरी लो झाल्यामुळे त्याचे दुसरे इंजिन सुरू होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांचा हेलिकॉप्टरने मुंबईला जाण्याचा नियोजित प्रवास रद्द करावा लागला. अखेर एकनाथ शिंदे यांनी कारने पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. पुणे विमानतळावरून विमानाने ते मुंबईला रवाना होणार आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *