Headlines

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव द्या:रिपब्लिकन पक्षाची मागणी, मेट्रो स्टेशनला नाव देत फसवणूक केल्याचा आरोप; महायुतीत असलो तरी गृहीत न धरण्याचा इशारा




दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याऐवजी मेट्रो स्टेशनला हे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने केला आहे. रेल्वे स्थानकाचेच नामकरण ‘चैत्यभूमी’ करावे, अशी पक्षाची मागणी आहे. महायुतीत असलो तरी सरकारने आम्हाला गृहीत धरू नये, असा इशारा पक्षाच्या नेत्यांनी दिला. हा निर्णय समोर आल्यानंतर पुणे शहर रिपब्लिकन पक्षाने आंबेडकर पुतळा परिसरात सरकारचा निषेध केला. प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, नगरसेवक नीलेश आल्हाट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या चैत्यभूमीचे नाव दादर रेल्वे स्थानकाला द्यावे, यासाठी आंबेडकरी समाज अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. सरकारने एका रात्रीत निर्णय बदलून समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप बाळासाहेब जानराव यांनी केला. ६ डिसेंबरपूर्वी रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गटाच्या विरोधामुळे सरकारने रेल्वे स्थानकाऐवजी मेट्रो स्टेशनला हे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप महिपाल वाघमारे यांनी केला. जातीयवादी पक्षांच्या दबावाखाली न येता निर्णय मागे घ्यावा, असे ते म्हणाले. अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आभार मानण्यासाठी आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पक्षाने एकत्र येण्याचे ठरवले होते. मात्र, रेल्वे स्थानकाऐवजी मेट्रो स्टेशनला नाव दिले जाणार असल्याचे समोर आल्याने निषेधासाठी एकत्र यावे लागले, असे संजय सोनवणे यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष बुद्धाच्या विचारांचा आणि शांततेचा पुरस्कार करतो. मात्र, प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारीही आहे, असे सोनवणे म्हणाले. जातीयवादी शक्तींच्या दबावाखाली येऊन सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना करू नये, असे बाळासाहेब जानराव यांनी सांगितले. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही जगप्रसिद्ध स्थळे आहेत. दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमीचे नाव दिल्यास सरकारचे सर्वत्र कौतुक होईल, असे जानराव म्हणाले. सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करून रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चैत्यभूमी’ करावे, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *