Headlines

पात्र उमेदवार मिळेनात, तर वीजपुरवठ्याचा निधीही प्रलंबित:मनुष्यबळ उपलब्ध होताच हिंगोलीची कॅथलॅब सुरू होणार; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांचा खुलासा




हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयातील कॅथलॅब बंद असल्यामुळे जिल्ह्यातील हृदयरुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याच्या मुद्द्यावर अखेर रुग्णालय प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. कॅथलॅब सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय व तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता होताच आणि स्वतंत्र थ्री-फेज वीजपुरवठ्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच ही यंत्रणा रुग्णांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल, असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) केला आहे. हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कॅथलॅब बंद असल्याने हृदयरुग्णांना उपचारांसाठी बाहेरगावी धाव घ्यावी लागत असल्याबाबत ‘दिव्य मराठी’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत रुग्णालय प्रशासनाकडे अधिकृत खुलासा मागवण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी पत्राद्वारे सद्यस्थितीची सविस्तर माहिती सादर केली आहे. 16 पैकी 8 पदे अद्याप रिक्त; जाहिरात देऊनही पात्र उमेदवार मिळेनात रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मनुष्यबळाची कमतरता हा कॅथलॅब सुरू होण्यातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) एकूण 16 पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ 8 पदे बाह्ययंत्रणेमार्फत (आउटसोर्सिंग) भरण्यात आली असून, उर्वरित 8 महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. प्रयत्न करूनही प्रतिसाद नाही ही रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हा सोसायटीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, तसेच जिल्हा स्तरावरून रीतसर जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या तांत्रिक पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आजपर्यंत ही 8 पदे भरली गेलेली नाहीत. परिणामी, उपलब्ध मनुष्यबळाअभावी कॅथलॅब सुरू करण्यास मोठी अडचण येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 315 केव्हीए ट्रान्सफॉर्मर आणि 250 केव्हीए डीजी सेटसाठी 14 जुलैलाच प्रस्ताव कॅथलॅबमधील अत्यंत संवेदनशील आणि अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी स्वतंत्र व अखंडित वीजपुरवठ्याची नितांत आवश्यकता असते. त्यासाठीच्या पायाभूत सुविधांबाबत प्रशासनाने पाठपुरावा केला आहे. कॅथलॅबसाठी 315 केव्हीए (kVA) क्षमतेचा स्वतंत्र थ्री-फेज पॉवर सप्लाय ट्रान्सफॉर्मर आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी 250 केव्हीए (kVA) क्षमतेचा डिझेल जनरेटर (डीजी) सेट बसवणे गरजेचे आहे. या कामासाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाने यापूर्वीच म्हणजे 14 जुलै 2026 रोजी मुंबई येथील आरोग्य सेवा राज्यस्तर रुग्णालय सहसंचालकांकडे सादर केला आहे. शासन स्तरावरून संबंधित निधी मंजूर होऊन प्राप्त होताच ट्रान्सफॉर्मर आणि डीजी सेट बसवून कार्यान्वित केले जातील; तसेच जिल्हा स्तरावरून रिक्त असलेली 8 पदे भरली गेल्यानंतर हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयातील कॅथलॅब हृदयरुग्णांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *