![]()
भटक्या समाजातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कार्यालयांत जावे लागू नये, यासाठी राज्य सरकार वस्त्यांमध्येच शिबिरे घेणार आहे. महाराजस्व अभियानांतर्गत ७ आणि ८ जानेवारीला राज्यभर ही शिबिरे होतील. जन्मदाखले, घरांचे दस्तऐवज, विविध सरकारी दाखले आणि कल्याणकारी योजनांचे लाभ एकाच ठिकाणी दिले जातील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपुरात दिली. नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी अभियानाची माहिती दिली. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि सरकारी विभागांच्या समन्वयातून शिबिरे घेतली जातील. भटक्या समाजातील अनेक नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी वस्त्यांमध्येच सरकारी सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. फासेपारधी समाजाच्या विकासासाठी गावठाणे स्थापन करणे, तांड्यांना ग्रामपंचायतीचे अधिकार देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा देणे आणि रोजगारासाठी आवश्यक साधने पुरवणे, या मुद्द्यांवर बैठक झाली आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सकारात्मक असून, संबंधित योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
Source link
भटक्या समाजाच्या वस्त्यांमध्ये 7 आणि 8 जानेवारीला शिबिरे:महाराजस्व अभियानांतर्गत जन्मदाखले, घरांचे दस्तऐवज आणि सरकारी योजनांचे लाभ मिळणार