Headlines

भुजबळांनी सत्यशोधकांची लढाई सोपी नसल्याचे सांगितले:ओतूरमध्ये राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन; थोरात आणि डॉ. अमोल कोल्हे उपस्थित




महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या शाळेचा वारसा लाभलेल्या ओतूर येथे शनिवारी (२१ नोव्हेंबर) राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन झाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठानने मार्केट यार्ड येथील सत्यशोधक नगरीत अधिवेशन आयोजित केले आहे. ‘समतेचे चक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांची लढाई सोपी नाही. ती आंदोलनातून लढावी लागेल,’ असे भुजबळ म्हणाले. भुजबळ म्हणाले, ‘महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजक्रांती केली. माणसाने माणसासारखे वागले पाहिजे, हा प्रवाहाविरुद्धचा विचार त्यांनी समाजात रुजवला. त्यांचा विरोध ब्राह्मण्यवाद आणि अंधश्रद्धेला होता. त्यांच्या समतेच्या मार्गाने आपल्याला पुढे जावे लागेल.’ पुण्यात हजारो महिला अथर्वशीर्ष पठणासाठी एकत्र येतात; मात्र रस्त्यापलीकडे असलेल्या भिडेवाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेत नतमस्तक होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचा इतिहास सांगणाऱ्या मालिका न पाहता प्रेक्षक सासू-सुनेच्या मालिका का पाहतात, असा सवालही भुजबळ यांनी केला. महिलांना देवीच्या रूपात न ठेवता समान स्थान आणि जबाबदाऱ्या द्यायला हव्यात, असे ते म्हणाले. स्त्री-पुरुष समानता स्वीकारणारे देशच प्रगती करतात. महिलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही भुजबळ म्हणाले. बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘देशाला सामर्थ्यवान बनवायचे असेल तर सत्यशोधक विचार आत्मसात करावे लागतील. बुद्ध, चार्वाक आणि वारकरी संप्रदायाने विद्रोही विचारांची परंपरा निर्माण केली. ही चळवळ पुढे नेण्याबरोबरच संविधानाचे संरक्षण केले पाहिजे.’ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फुले दाम्पत्याचे विचार आचरणात आणण्यात महाराष्ट्र कमी पडला का, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही, याचाही विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. जातीच्या चौकटी आणि धर्माच्या बंधनात न अडकता महाराष्ट्राने सत्यशोधक मार्ग स्वीकारावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फुले दाम्पत्य आणि सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. अर्धपुतळ्यांचे अनावरण, कष्टकरी महिला-पुरुषांचा सत्कार, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ आणि ‘शिवनेरीचे वैभव’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले. शाहीर स्वप्नील गायकवाड यांनी पोवाडे सादर केले. अधिवेशनाच्या पुढील सत्रांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रधर्म आणि सामाजिक परिवर्तनावर विचारमंथन होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *