![]()
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडून निषेध नोंदवला होता. या घटनेवरून राज्याच्या राजकारणात वाद निर्माण झाला होता. आता भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी पुस्तक फाडण्याच्या कृतीला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे. पुस्तकातील विचारांशी सहमत किंवा असहमत असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, त्यासाठी पुस्तक फाडणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. आशिष शेलार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपमधील एका महत्त्वाच्या नेत्याने पुस्तक फाडण्याच्या कृतीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शेलार यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडेही लक्ष लागले आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून शिवसेनेचा आक्षेप काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील काही मजकुरावर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आक्षेप घेतला होता. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सहा प्रवक्त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पुस्तकातील मजकुराचा निषेध केला होता. पत्रकार परिषदेत केवळ पुस्तकातील मजकुरावर नाराजी व्यक्त करण्यात आली नाही, तर पुस्तकाची पाने फाडूनही निषेध नोंदवण्यात आला. सोनिया गांधी यांच्या लिखाणातून सावरकरांचा अपमान झाल्याचा दावा करत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. या घटनेनंतर पुस्तकातील आशय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय विरोध व्यक्त करण्याची पद्धत यावरून चर्चा सुरू झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरूनही वाद या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी फाडलेल्या एका फोटोवरूनही मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. या फोटोमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर एकत्र दिसत होते. शायना एनसी यांनी हा फोटो फाडल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांनी मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचे सांगितले होते. शायना एनसी यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट करत असाच दावा केला. मात्र, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर त्यांनी जाहीरपणे माफी मागितली होती. त्यामुळे पुस्तक फाडण्याच्या कृतीबरोबरच बाळासाहेबांच्या फोटोचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरला होता. ‘पुस्तक फाडणे मला मान्य नाही’; शेलारांनी मांडली भूमिका या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पुस्तक आणि साहित्यनिर्मितीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पुस्तकातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही. काही विचारांशी सहमती असू शकते, तर काही विचारांमुळे एखाद्याला त्रास किंवा आक्षेप वाटू शकतो. पुस्तकातील मांडणीवर हरकत घेण्याचा आणि त्याविरोधात मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, पुस्तक फाडणे हा त्यावरचा योग्य मार्ग नाही, असे शेलार यांनी सांगितले. “एखाद्या पुस्तकातील विचार हे एखाद्याला प्रेरक आणि एखाद्याला पीडा निर्माण करणारे असू शकतात. एखाद्या पुस्तकातील मांडणीला आक्षेप असू शकतो. एखाद्याच्या त्यावर हरकती असू शकतात. पण मी हे मानणारा आहे की, पुस्तक आणि साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ करत असते. त्यावर आक्षेप किंवा हरकती असल्या तरीही पुस्तक फाडणे मला मान्य नाही. मी कधीच पुस्तक फाडलेलं नाही. ना मी कधी पुस्तक फाडलं, ना पंतप्रधानांचा कधी केलेला निर्णय फाडला,” असे आशिष शेलार म्हणाले. मतभेद असले तरी पुस्तकाचा आदर केला पाहिजे पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करताना शेलार यांनी साहित्यनिर्मिती ही समाजाच्या सुसंस्कृतपणाशी जोडलेली असल्याचे सांगितले. पुस्तकातील विचारांशी सहमत नसल्यास त्यावर टीका करता येते, आपली मते मांडता येतात किंवा आंदोलनही करता येते. मात्र, पुस्तकाच्या निर्मितीचा आणि साहित्याचा आदर राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पुस्तक निर्मिती हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. पुस्तकातील गाभ्याशी आपण सहमत असू किंवा असहमत असू, पण पुस्तकावर प्रेम करणारे असू शकले पाहिजे. पुस्तकातील विषयावर मतप्रदर्शन आणि आंदोलन करण्याचे अधिकार अबाधित आहेत. मात्र, पुस्तक निर्मितीच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे माझे मत आहे,” अशी भूमिका शेलार यांनी मांडली. शेलारांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पुस्तक फाडण्याच्या कृतीला विरोध दर्शवला आहे. शेलार यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव घेऊन थेट टीका केलेली नसली, तरी त्यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी पाहता त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. पुस्तकातील विचारांना विरोध करण्यासाठी पुस्तक फाडण्याऐवजी वैचारिक पातळीवर उत्तर दिले पाहिजे, असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. त्यामुळे शेलार यांच्या या भूमिकेवर शिवसेना काय प्रतिक्रिया देते आणि या मुद्द्यावर महायुतीमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काही प्रतिक्रिया उमटतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा…. ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’:अजित पवार विमान दुर्घटनेच्या तपासावरून हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ देत, ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’ असा खोचक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग, मतदारसंघ पुनर्रचना, अजित पवार विमान दुर्घटना आणि भाजपच्या राजकारणावरही भाष्य केले. सविस्तर वाचा…..
Source link
'पुस्तक फाडण्याची कृती मला मान्य नाही':सोनिया गांधींच्या पुस्तकावरून आशिष शेलारांनी मांडली स्पष्ट भूमिका, शिवसेनेच्या कृतीवरून राजकीय चर्चेला उधाण