![]()
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देत सरकारने राजकीय लाभ मिळवला. मात्र, आता पात्रतेच्या निकषांचे कारण पुढे करून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी खासदार डॉ. फौजिया खान यांनी केला. योजनेतून महिलांची नावे नेमकी कोणत्या निकषांवर कमी करण्यात आली, याचा सरकारने स्पष्ट खुलासा करावा. पात्रतेच्या नावाखाली महिलांची आर्थिक मदत बंद करून त्यांची फसवणूक करू नये. ही योजना बंद न करता पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. फौजिया खान यांनी राज्य सरकारच्या महिला धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉ. आशा मिरगे, कविता म्हेत्रे, अर्चना देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम महिलांवर राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम महिलांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ, रोजगाराच्या संधींचा अभाव, आरोग्य आणि पोषणाच्या समस्या यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांकडे शासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांच्या माध्यमातून न पाहता दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद करून महिलांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवणारे आपत्ती निवारण धोरण तयार करावे, अशी भूमिका खान यांनी मांडली. महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर मोहीम दुष्काळग्रस्त भागांतील महिलांच्या प्रत्यक्ष समस्या समजून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यभर घराघरांत सर्वेक्षण आणि महिला जनसंवाद मोहीम राबविण्यात येत आहे. विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातही ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेतल्या जात आहेत. महिलांच्या प्रश्नांवर आधारित मागण्यांचे निवेदन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येत असून, शासनाने या मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावेत, असे आवाहन खान यांनी केले. महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेची मागणी दुष्काळी परिस्थितीत महिलांना दिलासा देण्यासाठी विहिरींचे पुनर्भरण, नवीन पाणीस्रोत निर्माण करणे आणि ग्रामस्तरीय पाणी व्यवस्थापन समित्यांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील विधवांना आर्थिक मदत द्यावी, निराधार महिलांचे निवृत्तिवेतन वाढवावे तसेच महिला बचत गटांना अधिक अनुदान आणि कर्जसवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय रोजगार हमी योजनेवरील महिलांना पुरुषांप्रमाणे समान वेतन आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा मिळाव्यात. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण व आरोग्यविषयक सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात. शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता द्यावी, स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी आणि संकटात सापडलेल्या महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी गावपातळीवर स्वतंत्र मदत कक्ष सुरू करावेत, अशा विविध मागण्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आल्या. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना आखताना महिलांच्या गरजा आणि त्यांच्या अडचणींचा स्वतंत्रपणे विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र आर्थिक तरतूद करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. केवळ घोषणा न करता महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे डॉ. फौजिया खान यांनी स्पष्ट केले. हेही वाचा…. रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला पक्षातूनच विरोधाची चर्चा:खासदार अमर काळेंचा मात्र पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सध्या अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना काहीसा विराम मिळाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या ‘न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा’वरून पक्षांतर्गत मतभेद समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी रोहित पवार यांच्या मोर्चाला जाहीरपणे पाठिंबा दर्शविल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे वेधले गेले आहे. सविस्तर वाचा….
Source link
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची नावे का कमी केली?:सरकारने खुलासा करावा; पात्रतेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करू नका – डॉ. फौजिया खान