![]()
मुंबईत पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी महिला नागरिकांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य आफ्रिकेतील चाड देशातील दोन महिला नागरिकांकडील तब्बल 97 लाख 50 हजार रुपयांची रोकड आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. मेट्रो सिनेमाजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी या गुन्ह्याचा वेगाने तपास करत अवघ्या 48 तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. विशेष म्हणजे, लुटलेली संपूर्ण 97 लाख 50 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. मेट्रो सिनेमाजवळ टॅक्सी अडवून महिलांना धमकावले मिळालेल्या माहितीनुसार, चाड देशातील एक महिला नागरिक आपल्या मैत्रिणीसह धनजी स्ट्रीट येथून कुलाब्याच्या दिशेने टॅक्सीने प्रवास करत होती. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असलेली बॅग होती. याचदरम्यान काही आरोपी स्कूटरवरून त्यांच्या टॅक्सीचा पाठलाग करत होते. टॅक्सी मेट्रो सिनेमा परिसरात पोहोचताच आरोपींनी पुढे येऊन टॅक्सी अडवली. यानंतर आरोपींनी आपण पोलीस असल्याचे भासवून दोन्ही महिलांना धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या नावाचा धाक दाखवत त्यांनी महिलांकडील 97 लाख 50 हजार रुपये असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दोन्ही महिला घाबरल्या. आरोपी पसार झाल्यानंतर पीडित महिलांनी आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची माहिती दिली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला परदेशी महिला नागरिकांकडील एवढ्या मोठ्या रकमेची लूट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 355/2026 नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली. मुंबई, ठाणे ते अहिल्यानगरपर्यंत शोधमोहीम आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चेंबूर, कळवा आणि ठाणे परिसरात तपास केला. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यातही पोहोचले. अखेर गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगरमधील ढोकेश्वर येथून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपींकडून लुटलेली संपूर्ण 97 लाख 50 हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. 48 तासांत गुन्ह्याची उकल परदेशी महिला नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याचा प्रकार गंभीर मानला जात होता. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 48 तासांत आरोपींना शोधून काढले. तसेच लुटलेली संपूर्ण रोकडही जप्त केली. मुंबईत घडलेल्या या मोठ्या लुटीचा अल्पावधीत छडा लावल्याने आझाद मैदान पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे. हेही वाचा…. रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला पक्षातूनच विरोधाची चर्चा:खासदार अमर काळेंचा मात्र पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सध्या अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना काहीसा विराम मिळाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या ‘न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा’वरून पक्षांतर्गत मतभेद समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी रोहित पवार यांच्या मोर्चाला जाहीरपणे पाठिंबा दर्शविल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे वेधले गेले आहे. सविस्तर वाचा….
Source link
मुंबईत परदेशी महिलांना 97.50 लाखांचा गंडा:पोलीस असल्याचे भासवून रोकड लुटली, 48 तासांत आरोपी जेरबंद