![]()
संगीत, नृत्य आणि कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मित्र फाऊंडेशनतर्फे यंदा १५ हून अधिक युवा कलाकारांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. मित्र फाऊंडेशनतर्फे दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणारा मित्र महोत्सव रविवार, २९ नोव्हेंबर रोजी पंडित फार्म्स येथे सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता अशा दोन सत्रांत रंगणार आहे. संगीत, नृत्य आणि कला यांचे पूर्णवेळ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. मित्र फाऊंडेशनतर्फे महोत्सवाच्या सायंकाळच्या सत्रात ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. अरविंद थत्ते यांना २५ हजार रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. संवादिनी वादन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत मित्र फाऊंडेशनतर्फे हा सन्मान देण्यात येणार आहे. मित्र फाऊंडेशनतर्फे आयोजित महोत्सवाच्या सकाळच्या सत्राची सुरुवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ग्रॅमी पुरस्कार विजेते राकेश चौरासिया यांच्या बासरीवादनाने होणार असून, त्यांना तबला साथ सत्यजित तळवलकर करणार आहेत. त्यानंतर पंडित विजय कोपरकर यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना तबला साथ विवेक भालेराव आणि संवादिनी साथ राहुल गोळे करणार आहेत. सायंकाळच्या सत्रात पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन होणार असून, त्यांना तबला साथ सत्यजित तळवलकर करणार आहेत. त्यानंतर विदुषी पद्मविभूषण गिरिजा देवी यांच्या शिष्या मालिनी अवस्थी यांचे गायन होणार आहे. त्या कजरी, होरी, झुला आणि ठुमरी या संगीतप्रकारांची प्रस्तुती करणार असून, त्यांना तबला साथ पंडित अरविंदकुमार आझाद आणि संवादिनी साथ पंडित धर्मनाथ मिश्रा करणार आहेत.
Source link
मित्र फाऊंडेशन 15 हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार:प्रत्येकी 11 हजार रुपये; डॉ. अरविंद थत्ते यांना 25 हजारांचा जीवनगौरव पुरस्कार