Headlines

अमरावतीत बालविवाह रोखण्यासाठी विविध विभागांना जबाबदारी:जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; शाळा, ग्रामपंचायती, महिला बचत गट आणि पोलिसांचा सहभाग, 27 नोव्हेंबरला विशेष कार्यक्रम




अमरावती जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ३० नोव्हेंबरपर्यंत ‘बालहक्क सप्ताह’ आणि ‘बालविवाह निर्मूलन अभियान’ राबवणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विविध जनजागृती कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, महिला बचत गट, पोलिस आणि ग्रामपंचायतींना यात जबाबदारी देण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरला विशेष कार्यक्रम होणार आहे. या अभियानातून बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालविवाहाचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवले जातील. बालविवाह रोखण्यासाठी समाजाचा सहभाग मिळवणे हा अभियानाचा उद्देश आहे. शिक्षण विभाग शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणार आहे. विद्यार्थ्यांच्या रॅली, सामूहिक प्रतिज्ञा, निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा घेतल्या जातील. आरोग्य विभाग किशोरी सभा घेऊन किशोरवयीन मुलांना आरोग्य आणि पोषणाबाबत मार्गदर्शन करेल. बालविवाहाचा माता आणि बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणामही सांगितला जाईल. जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग ग्रामपंचायत स्तरावर विशेष बैठका घेईल. दवंडी आणि ग्रामसभांमध्ये बालविवाहमुक्त गावाचा ठराव घेण्याबाबत कार्यवाही केली जाईल. महिला व बालविकास विभाग अंगणवाड्यांमध्ये किशोरी सभा, ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या बैठका आणि पालकांचे समुपदेशन घेईल. उमेद अभियान आणि महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बचत गटांच्या बैठकांमध्ये जनजागृती आणि सामूहिक प्रतिज्ञा घेतील. पोलिस विभाग पोलिस ठाण्यांच्या स्तरावर जनजागृती बैठका घेऊन पोलिस पाटील आणि ग्रामस्तरीय यंत्रणांमार्फत कायद्याची माहिती देईल. बालविवाहाची माहिती मिळाल्यास तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन विविध विभागांशी समन्वय साधून बालविवाहाची संभाव्य प्रकरणे शोधतील आणि प्रतिबंधात्मक उपाय करतील. बालकांच्या संरक्षणासाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ची माहिती दिली जाईल. बालविवाह होत असल्याचे समजल्यास हेल्पलाइन किंवा संबंधित पोलिस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व कार्यक्रम घेणे अनिवार्य आहे. कार्यक्रम झाल्यानंतर सर्व विभागांनी त्यांचा सविस्तर अहवाल २ डिसेंबरपर्यंत जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे द्यावा, असे निर्देश आहेत. — संजय गट, जिल्हा महिला व बालविकास विभाग, अमरावती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *