![]()
पुण्यात 69 व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील रायफल प्रकाराच्या स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली. स्पर्धा 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 10 वर्षांनंतर ही राष्ट्रीय स्पर्धा पुन्हा पुण्यात होत आहे.
.
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (एनआरएआय) वतीने बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नेमबाजी केंद्रावर स्पर्धा आयोजित केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे महासचिव पवन कुमार सिंह उपस्थित होते.
स्पर्धेत देशभरातील 7,500 हून अधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. यात पुरुष, महिला आणि पॅरा नेमबाजांचा समावेश आहे. रायफल प्रकारातील विविध स्पर्धांमध्ये ते भाग घेतील.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा स्वप्नील कुसळे, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि विश्वविजेता रुद्रांक्ष बाळासाहेब पाटीलही सहभागी होणार आहेत. ऑलिम्पियन अंजुम मौदगिल, दोन वेळची ऑलिम्पियन आणि माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज एलावेनिल वलारिवन, तसेच लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवलेला निरज कुमार यांचाही यात समावेश आहे.
भारतीय नेमबाजीच्या राष्ट्रीय स्पर्धांच्या दिनदर्शिकेत या स्पर्धेला महत्त्व आहे. नव्या स्पर्धात्मक हंगामाची सुरुवात या स्पर्धेने होते. भारतीय नेमबाजी संघाच्या निवड प्रक्रियेसाठी महत्त्वाचे रँकिंग गुण मिळवण्याची संधीही नेमबाजांना मिळते.
स्पर्धेच्या तयारीसाठी बालेवाडी येथील नेमबाजी केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले आहे. येथे नवे इलेक्ट्रॉनिक टार्गेट्स बसवले असून, खेळाडूंसाठी आधुनिक स्पर्धा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने या सुधारणा करण्यात आल्या.
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे महासचिव पवन कुमार सिंह म्हणाले, “10 वर्षांनंतर रायफल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुण्यात आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट सहकार्य केले असून, नेमबाजी केंद्राच्या नूतनीकरणासाठी आणि आधुनिकीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
“या केंद्रात नेमबाजांना चांगला अनुभव मिळेल, असा मला विश्वास आहे. येथील हवामानही अनुकूल आहे. सर्व सहभागी खेळाडूंसाठी ही स्पर्धा यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.