Headlines

नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानच्या अडचणीत वाढ, जिल्हा कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला; गर्भावस्थेचे कारण ठरवले अमान्य




बहुचर्चित टीसीएस (TCS) बीपीओ कार्यालयातील लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वी न्यायालयाने तिला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. आता या निर्णयाविरोधात निदा खानचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या पहिल्या एफआयआरमध्ये बलात्कार, धार्मिक भावना दुखावणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत. या गुन्ह्यात निदा खानचे नाव समाविष्ट असून, तिने पीडित महिलेला बुरखा व धार्मिक साहित्य देऊन धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तसेच, तिच्या मोबाईलमध्ये धार्मिक ॲप्स इन्स्टॉल करण्यास मदत केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बचाव पक्षाचा युक्तिवाद काय होता? निदा खानच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, ती गर्भवती असून तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. महाराष्ट्रात धर्मांतराविरुद्ध कोणताही कायदा नाही, त्यामुळे तिच्यावर जास्तीत जास्त ‘धार्मिक भावना दुखावल्याचा’ खटला चालू शकतो. तिच्यावरील सर्व आरोप एकाच प्रकरणाशी संबंधित आहेत, त्यामुळे तिला अटकेपासून संरक्षण मिळावे. मात्र, फिर्यादी पक्षाने निदा खानची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत जामिनाला जोरदार विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. जोशी यांनी निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. नेमके प्रकरण काय? फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण उघडकीस आले. एका स्थानिक राजकीय कार्यकर्त्याने तक्रार देत असा आरोप केला होता की, नाशिकमधील टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या एका हिंदू महिलेवर इस्लामिक पद्धतींचे पालन करण्यासाठी दबाव टाकला जात होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुप्त चौकशी करत काही कर्मचारी ‘हाऊसकीपिंग’ कर्मचाऱ्यांच्या वेशात तैनात केले होते. या तपासातून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुरावे मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. इतर आरोपी ताब्यात, निदा खान फरार या प्रकरणात एकूण ८ जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दानिश शेख, शफी शेख, आसिफ अन्सारी, तौसीफ अत्तर, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि अश्विनी चैनानी या सात जणांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. एफआयआर दाखल झाल्यापासून निदा खान ही फरार आहे. या प्रकरणात टीसीएसची भूमिका काय? या प्रकरणानंतर टीसीएस कंपनीने लैंगिक छळ आणि सक्तीच्या कोणत्याही प्रकाराबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जाहीर केले आहे. संबंधित आरोपी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, कंपनीने अंतर्गत चौकशीसाठी ‘डेलॉईट’ आणि ‘ट्रायलीगल’ या स्वतंत्र संस्थांची नियुक्ती केली आहे. या चौकशीचे नेतृत्व कंपनीच्या सीओओ (COO) आरती सुब्रमण्यम करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *