![]()
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. इतकेच नव्हे, तर बेंगळुरू-पुणे महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी चिमुरडीवर अंत्यसंस्कार केले. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्ट भूमिका घेत राजकीय नेत्यांनी भेटीस येऊ नये, अशी विनंती केली होती. तरीही काही नेत्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रशासनावर आणि संबंधित यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात जे पावले उचलली पाहिजेत, ती योग्य वेळी उचलली जात नाहीत, असे स्पष्टपणे सांगत त्यांनी राज्य महिला आयोग आणि बालहक्क समितीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात योग्य पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांनी पुढे बोलताना या प्रकरणात सक्षम आणि अनुभवी वकील नेमण्याची गरज अधोरेखित केली. भोर तालुक्यातील वकील संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करतो. आरोपीचा कोणीही वकीलपत्र घेणार नाही, अशी चर्चा आहे, ही बाबही महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. न्यायप्रक्रिया मजबूत व्हावी यासाठी सरकारने योग्य कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचे विधान करत सांगितले की, महिला आयोगाच्या अध्यक्षा नसल्या तरी अधिकारी कार्यरत आहेत. या वक्तव्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच, या प्रकरणात समाजातील विविध घटक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा दरम्यान, या प्रकरणातील आरोपीवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून, पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. आता या प्रकरणात पुढील तपास आणि न्यायप्रक्रिया कशी पार पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
भोर प्रकरणात पीडित कुटुंबाची रोहित पवारांकडून भेट:पीडितांसाठी मजबूत लढ्याची भूमिका; प्रशासनावर थेट सवाल, यंत्रणांवर गंभीर प्रश्न