Headlines

करमाळ्यामधील टंचाई आढावा‎बैठकीत पाणी, वीज प्रश्नांवर मंथन‎:खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक‎




येथील पंचायत समिती सभागृहात आज टंचाई आढावा बैठक धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत पाणीटंचाई, वीजपुरवठा आणि सिंचन व्यवस्थापन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, भाजपच्या गटनेत्या रश्मी बागल, उपसभापती अजित विघ्ने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कुकडी व सीना-कोळगाव प्रकल्प अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या उन्हाळी आवर्तनाबाबत पाण्याचा प्रश्न, तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांमधील अडचणी मांडण्यात आल्या. यावर खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी अतिरिक्त डीपीची गरज, तसेच वीज टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. यावर खासदारांनी येत्या १५ दिवसांत वीज समस्येसाठी स्वतंत्र बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. केंद्र शासनाच्या जलसिंचन बैठकीत महाराष्ट्रातील जलजीवन योजनेचा मुद्दा उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील अपूर्ण जलजीवन योजनांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेवटी, पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. या बैठकीस करमाळा तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते. खासदार मोहिते-पाटील यांनी कुकडी प्रकल्पातील पाण्याचे टेल टू हेड नियोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच करमाळा तालुक्यातील कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामे निधीअभावी अपूर्ण असल्यास प्रस्ताव सादर करण्यास सांगितले व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पिण्याच्या पाण्यासाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, तसेच विनाकारण गुन्हे दाखल करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. संध्याकाळी ६ ते १० या वेळेत शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *