![]()
सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे अंगावर हळद लागण्यापुर्वीच भावी नवरदेवाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ता. 5 सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तर एकुलता एक मुलगा गेल्याने गांधीले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील आनंद हरिभाऊ गांधीले (22) हे कुटुंबियांसह राहतात. घरी आई, वडिल असा परिवार असून त्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. आनंद हेच शेती करतात. काही दिवसांपुर्वीच आनंद यांचा विवाह हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथे ठरला होता. लग्न सोहळ्यापुर्वी गावालगत असलेल्या शेतात त्यांच्या घराचे बांधकाम देखील केले जात होते. त्यामुळे आनंद हे दररोज शेतात जाऊन घराच्या कामाकडे लक्ष देत होते. या शिवाय घरी लग्न सोहळा असल्याने लग्नाचीही धामधुम सुरु होती. दरम्यान, नेहमी प्रमाणे आनंद हे सोमवारी ता. 4 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेतातील घरी गेले होते. आज सकाळी आठ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहणी केली असता आनंद यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत आनंद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत आनंद यांचा गुरुवारी ता. 7 रोजी त्यांचा विवाह सोहळा असल्याने आज सकाळी त्यांना नेण्यासाठी वधुकडील मंडळी येणार होती. मात्र अंगावर हळद लागण्यापुर्वीच आनंदने गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मयत आनंद यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
Source link
हिंगोलीत अंगावर हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या:सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावावर शोककळा