Headlines

उन्हाच्या झळा सोसत उद्धवने रिक्षावरच फिरवले नशिबाचे चाक:माळेगावच्या तरुणाची रसवंतीतून गरुडझेप; तरुणांसमोर ठेवला स्वावलंबनाचा आदर्श‎




उन्हाळ्याचा पारा चाळीशी पार जात असताना अंगाची लाहीलाही होत आहे. अशा कडक उन्हात सर्वसामान्य नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत. मात्र, याच उन्हात स्वतः घाम गाळत इतरांना तृप्त करणारा माळेगावचा २२ वर्षीय तरुण उद्धव मच्छिंद्र गाडेकर कौतुकाचा विषय ठरत आहे. त्याची रिक्षावरील रसवंती केवळ तहान भागवत नाही, तर बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भरतेचा ‘गोड’ संदेशही देत आहे. उद्धवचे शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झाले असून वडील शेतकरी आहेत. घरची बेताची परिस्थिती असल्याने नोकरीसाठी वणवण करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार उद्धवने केला. चार वर्षांपूर्वी एका हातगाडीवरून त्याने उसाचा रस विकण्यास सुरुवात केली. उन्हातान्हात गाडी ढकलत व्यवसाय करणे आव्हानात्मक होते, पण जिद्द हरली नाही. दोन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर त्याने एक जुनी रिक्षा खरेदी केली आणि त्यात रस काढण्याचे यंत्र बसवून व्यवसायाला ‘मोबिलिटी’ दिली. उद्धवची ही ‘चालती-बोलती’ रसवंती आज शेवगाव तालुक्यातील गल्लीबोळात फिरत आहे. केवळ १५ रुपयांत थंडगार रसाचा ग्लास उपलब्ध करून देत असल्याने ग्राहकांचीही मोठी गर्दी होते. दररोज सरासरी २०० ग्लासची विक्री होत असून, दिवसाला ३ ते साडेतीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळत असल्याचे उद्धव अभिमानाने सांगतो. नोकरी मिळाली नाही तर खचू नका! आजचा तरुण नोकरीच्या मागे धावत आहे. नोकरी मिळाली तर उत्तमच, पण नसेल तर स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय सुरू करा. व्यवसायात आपण स्वतःच्या मनाचे राजे असतो, असा कानमंत्र उद्धवने आपल्या तरुण मित्रांना दिला आहे. भविष्यात हा व्यवसाय अधिक विस्तारण्याचा त्याचा मानस आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *