Headlines

धक्कादायक:पत्नी सोडून गेल्यानंतर मुले रोज त्रास देत असल्याने मुलीचा निर्घृण खून करून मृतदेह जंगलात फेकला




पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका बापानेच आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी बापाला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. सागर शिंदे (२९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली) असे या नराधम बापाचे नाव आहे. पत्नी सोडून गेल्यानंतर मुले रोज त्रास देत असल्याने त्यांना जिवे मारण्याचा कट बापानेच रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दिनांक ६ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास, आळेफाटा पोलिस हद्दीतील संतवाडी (ता. जुन्नर) येथील जंगलात पुणे-नाशिक हायवे लगत एक ५ वर्षांचा मुलगा रडताना आढळला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव सांगितले. “माझे पप्पा यांनी मला आणि माझी लहान बहीण हिला फिरायला घेऊन आले होते, पण मला रात्री जंगलात सोडले आणि पप्पा व बहीण कुठे गेले मला माहीत नाही,’ अशी माहिती त्या लहान मुलाने दिली. पोलिसांनी तपास करत मुलाच्या आजोबांशी संपर्क साधला. आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर ५ मे रोजी मुलगी (३.५ वर्षे) व मुलगा (५.५ वर्षे) या दोघांना फिरायला नेतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. ६ मे रोजी सकाळी तो घरी परतला, मात्र मुले सोबत नव्हती. विचारणा केली असता त्याने मुले चाकणला रूमवर असल्याचे सांगून वेळ मारून नेली. दरम्यान, नातू याने आळेफाटा येथे बेवारस सापडल्याचे समजताच कुटुंबीयांचा संशय बळावला. अशी दिली खुनाची कबुली आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तातडीने सागर शिंदे याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. “मुलीचा गळा दाबून तिचा खून केला आणि मृतदेह हॉटेल फाऊंटन समोरील फॉरेस्टमध्ये फेकून दिला,’ असे त्याने मान्य केले. ७ मे रोजी सकाळी शोध पथकाला मुलीचा मृतदेह जंगलात सापडला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), १०९, ९३ आणि २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *