Headlines

डी.वाय. पाटील विद्यापीठ, डसॉल्ट सिस्टिम्समध्ये सामंजस्य करार:पुण्यात अत्याधुनिक 'डिजिटल इंजिनिअरिंग अनुभव केंद्र' उभारणार




पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डसॉल्ट सिस्टिम्स’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार विद्यापीठ कॅम्पसमध्ये अत्याधुनिक ‘डिजिटल इंजिनिअरिंग आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अनुभव केंद्र’ स्थापन केले जाणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डसॉल्ट सिस्टिम्सच्या सहकार्याने उभारले जाणारे हे केंद्र महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक असेल. या केंद्रामुळे विद्यापीठाच्या ‘स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग’ अभ्यासक्रमाला नवी दिशा मिळणार आहे. यामध्ये नेक्स्टजन प्रॉडक्ट इनोव्हेशन लॅब, इंटेलिजंट प्रॉडक्शन सिस्टम लॅब आणि व्हर्च्युअल ट्विन व सिम्युलेशन लॅब अशा जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल ट्विन्स, जनरेटिव्ह डिझाइन आणि मल्टी-फिजिक्स सिम्युलेशन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. या सहकार्यांतर्गत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर लाईव्ह प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स आणि उद्योग तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. तसेच, प्राध्यापकांसाठी तीन वर्षांचा ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स’ कार्यक्रम राबवला जाणार आहे, ज्यामुळे त्यांना प्रगत डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियांमध्ये नैपुण्य मिळवता येईल. डसॉल्ट सिस्टिम्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक एनजी यांनी या केंद्राबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “हे केंद्र ‘मेक इन इंडिया’ आणि ‘इंडस्ट्री ४.०’ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक सक्षम परिसंस्था निर्माण करेल.” डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) मनीष भल्ला यांनी सांगितले की, हे केंद्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल. अनुभवाधारित शिक्षणामुळे आमचे विद्यार्थी प्रत्यक्ष औद्योगिक समस्या सोडवण्यास सक्षम होतील आणि भविष्याभिमुख अभियंते म्हणून घडतील. या करारामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख अधिक गडद होत असून, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *