Headlines

पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’चे उद्घाटन:आधुनिक ज्ञान-कौशल्य पारंपरिक ज्ञानाशी जोडावे – माजी सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड




पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’ या अत्याधुनिक नेत्रसेवा केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. चंद्रचूड यांनी आधुनिक ज्ञान आणि कौशल्याची परंपरागत ज्ञानासोबत सांगड घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. शुक्रवारी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला नारायण नेत्रालयाचे संचालक डॉ. नरेन शेट्टी, पद्मश्री डॉ. विकास महात्मे आणि डॉ. नरेंद्र वैद्य उपस्थित होते. डॉ. तन्मय वैद्य (कॅटॅरॅक्ट व रिफ्रॅक्टिव्ह सर्जन) आणि डॉ. करिश्मा तेंडुलकर (व्हिट्रिओरेटिनल सर्जन) यांनी हे केंद्र स्थापन केले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात सर्वसमावेशक, नैतिक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा उद्देश आहे. या केंद्रात नवजात बालकांच्या रेटिनल तपासणीपासून बाल नेत्रसेवा, मायोपिया मॉनिटरिंग, ड्राय आय उपचार, रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी मूल्यांकन, डायबेटिक रेटिनोपॅथी व्यवस्थापन, ग्लॉकोमा तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि प्रगत रेटिनल उपचारांपर्यंत सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध असतील. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी वैद्यकीय क्षेत्रात मनुष्य संवेदनेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, नेत्र आणि दृष्टी यांचा महत्त्वाचा संबंध असून त्यातूनच दृष्टी निर्माण होते. रुग्णसेवा हा ईश्वरी कार्याचाच एक भाग आहे. सरावाशिवाय कौशल्य प्राप्त होत नाही, असे सांगत त्यांनी डॉ. करिश्मा तेंडुलकर यांना अधिक रुग्णांवर उपचार करून विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. आपल्या पत्नीच्या डोळ्यांतून सातत्याने पाणी येत असल्याने त्यांनी बेंगळूरु येथील नारायण नेत्रालयात उपचार घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तिला कोणतीही समस्या जाणवली नाही. डोळे हे शरीराचा महत्त्वाचा भाग असून त्याकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी नमूद केले. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी न्यायालयावरील विश्वासाप्रमाणेच डॉक्टर निवडताना विश्वासार्हता महत्त्वाची असल्याचे सांगितले. डॉ. तन्मय वैद्य आणि डॉ. करिश्मा तेंडुलकर यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात, असे ते म्हणाले. ज्ञान आणि कौशल्यासोबत संवेदनशील मनही आवश्यक असून, हे दोन्ही डॉक्टर तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांना उत्तम सेवा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *