![]()
मुळा नदीखोऱ्यात अकोले तालुक्यासाठी नवीन पाणीसाठा निर्माण केल्याशिवाय संगमनेरच्या पठार भागातील नळपाणी पुरवठा योजनेस थेंबभरही पाणी देणार नाही, असा पुनरुच्चार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला. अकोल्याच्या हक्काच्या पाण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे अभिवचन त्यांनी यावेळी मुळा खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिले. वाघापूर (ता. अकोले) येथे आयोजित महामानवांच्या संयुक्त जयंती उत्सवाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच सीताराम लांडे होते. व्यासपीठावर सरपंच रंजना बराते, माजी सरपंच मंदा बराते, संजय औटी, उपसरपंच महेंद्र बराते, मिलिंद जाधव, गुलाब जगताप, योगेश लांडे, श्रीकांत गायकवाड, रवी गायकवाड, शुभम निकाळे, विनोद शिंदे उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. लहामटे यांनी सिद्धार्थनगर येथे ३० लाख रुपये खर्चाचे सभामंडप आणि ७ लाख रुपयांच्या समाजमंदिराचे लोकार्पणही केले. कार्यक्रमात बोलताना डॉ. लहामटे यांनी तालुक्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला. वाघापूर येथे मुळा नदीवर पुलाचे बांधकाम करणे, लिंगदेव येथे एमआयडीसी सुरू करणे आणि सिद्धार्थनगर येथील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. अकोले तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, बहुजन आणि आदिवासींसह सर्वच समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले. त्यांनी दिलेला आरक्षणाचा मंत्र दुर्बलांना सबल करणारा ठरला असून, त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार लहामटे म्हणाले. याप्रसंगी सिताराम लांडे, राहुल गायकवाड, रोहन गायकवाड, मारुती लांडे, सुरेश गायकवाड, सुनील डोळस, सखाराम लांडे, सुनील गीते यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास वाघापूर विकास सेवा सोसायटीचे सचिव संजय फुलसुंदर, धम्मपाल निकाळे, सुनील रकटे, संजय जगताप, प्रदीप जगताप, बंटी जगताप, साहिल जगताप, महादू लांडे, मनेश गायकवाड, अनिल जाधव, धनंजय रकटे, युवराज गायकवाड, प्रियंका शिंदे, संध्या शिंदे, गणपत बराते, कुंडलिक गंभीरे, हिरामण गंभीरे, भरत गंभीरे, राजेंद्र गंभीरे, मारुती वाजे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सूर्यभान शिंदे यांनी, तर आभार भीमराज रक्टे यांनी मानले.
Source link
अकोल्याचे पाणी पळवू देणार नाही; आधी नवीन साठा:मगच बाहेर पाणी, मुळा नदीवरील पुलासह एमआयडीसीचे दिले आ. डॉ. लहामटेंनी आश्वासन