![]()
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन’च्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद नंदकुमार वाळंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख शरद बुट्टे-पाटील यांच्या विशेष शिफारशीनुसार ही निवड जाहीर करण्यात आली. मिलिंद वाळंज यांनी आजवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना येणाऱ्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या याच कामाची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन संघटनेने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन ही देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे अधिकार, मान-सन्मान आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणारी एक मोठी संघटना आहे. आगामी काळात पुणे जिल्ह्यात संघटनेचे जाळे तळागाळापर्यंत विस्तारण्याचे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला संघटनेशी जोडण्याचे मोठे आव्हान वाळंज यांच्यासमोर असणार आहे. संघटनेची बांधणी अधिक मजबूत करून सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या निवडीप्रसंगी व्यक्त केला. आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मिलिंद वाळंज म्हणाले की, संघटनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ ठरवेन. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेचे कार्य प्रभावीपणे राबवून स्थानिक सदस्यांच्या समस्या मार्गी लावण्याला माझे प्राधान्य असेल. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.
Source link
मिलिंद वाळंज राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी कार्यरत संस्थेची निवड