![]()
पुण्यात डेटिंग ॲपच्या माध्यमातून गुन्हेगारीचे नवे आणि धक्कादायक स्वरूप समोर आले आहे. “गे डेटिंग अँड चॅट’ या ॲपचा वापर करून तरुणांना एकांतात बोलावणे, त्यांना बेदम मारहाण करणे आणि लुटणे अशा गंभीर कृत्यांचा छडा वारजे माळवाडी पोलिसांनी लावला आहे. पीडित तरुणाने तक्रार दिल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. भेटायला बोलावले आणि थेट लूटमार मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाला या डेटिंग ॲपवर चॅटिंगदरम्यान भेटण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तो तरुण विश्वासाने भेटायला गेला असता, आरोपींनी त्याला निर्जनस्थळी गाठून बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराचा मोबाइल हिसकावून घेत जबरदस्तीने “यूपीआय’ द्वारे स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतले. एवढ्यावरच न थांबता त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी हिसकावून आरोपी पसार झाले. ३० मिनिटांचा “ॲक्शन प्लॅन’ घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या पथकाने फिर्यादीकडून माहिती घेत तांत्रिक विश्लेषण केले. दरम्यान, पोलिस अंमलदार बालाजी काटे व महादेव शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित अतुलनगर चौकात थांबलेला आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. पीडिताची आपबिती : मारहाण केली मी फक्त चॅटिंग करताना त्यांनी मला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी मला मारहाण केली आणि मोबाइल हिसकावून घेतला. जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि गळ्यातील साखळी घेऊन पळाले, असे पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी आवाहन केले आहे की, अनोळखी डेटिंग ॲप्सवर कुणालाही भेटायला जाताना सार्वजनिक ठिकाणीच जावे. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडल्यास न घाबरता त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
Source link
पुण्याची घटना:“गे-डेटिंग ॲप’वरून तरुणांना जाळ्यात ओढणारे अटकेत, एका सराईत आरोपीसह अल्पवयीन साथीदार ताब्यात