![]()
राहाता शहरातील १३ वर्षीय ओमकार गायकवाड या चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले असून हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी मृतदेह थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ओमकारची आजी शनी चौक परिसरातून जात होती. तिच्या मागून ओमकारही निघाला होता. कृष्ण मंदिरासमोरील घराजवळील वळणावर भरधाव इर्टिगा कारने प्रथम ओमकारच्या आजीला धडक दिली आणि त्यानंतर ओमकारला जोरदार धडक देऊन उडवले. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, ओमकार खाली पडल्यानंतर चालकाने वाहन पुन्हा मागे घेत त्याच्या अंगावरून चाक फिरवले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओमकारला प्रथम शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. तसेच काही प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊनही माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि गायकवाड कुटुंबियांनी ओमकारचा मृतदेह ॲम्बुलन्समधून थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणत निषेध आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ओमकारचे आजोबा पांडुरंग गायकवाड आणि आजी आशा गायकवाड यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले, आमचे कोणाशीही वैर नाही. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. मात्र ज्या पद्धतीने गाडी पुन्हा ओमकारच्या अंगावर घालण्यात आली तो प्रकार पाहता हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला प्रकार वाटतो. आमच्या चिमुकल्याचा काय गुन्हा होता? आम्हाला फक्त न्याय हवा आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी सायंकाळी तीन जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याने नेमकी कोणती कलमे लावण्यात येणार, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. शहरात गुन्हेगारी वाढत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी वेळीच गंभीर दखल घेतली नाही, हा संतापजनक प्रकार असल्याचा संतप्त सूर आता उमटत आहे. .. अन् ग्रामस्थांचेही डोळे डबडबले ओमकार हा कुटुंबातील एकुलता एक नातू असल्याने त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंदोलनावेळी उपस्थित ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसून आले.
Source link
कारच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात ठिय्या:अपघात नव्हे हा तर घातपात, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप