Headlines

महिलेची 21 लाखांची फसवणूक:विवाह संकेतस्थळावरील ओळखीने बसला गंडा




पुण्यात विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीमुळे एका महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेतले आणि परत करताना खेळण्यातील बनावट नोटा देऊन पळ काढला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोरखनाथ गावंडकर (रा. कडसुरे, जि. रायगड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरात राहते. गेल्या वर्षी तिने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती, जिथे आरोपीने तिच्याशी संपर्क साधला. आरोपीने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्याने स्वतःला आर्थिक अडचणीत असल्याचे भासवून वेळोवेळी तिच्याकडून २१ लाख रुपये घेतले. महिलेने जेव्हा पैसे परत करण्याची मागणी केली, तेव्हा आरोपीने तिला सिंहगड रस्ता परिसरात भेटायला बोलावले. आरोपी आणि महिला एका हॉटेलमध्ये भेटले. तिथे आरोपीने एका पिशवीत लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा भरून महिलेला दिल्या. महिलेने तात्काळ पिशवी उघडून पाहिली नाही आणि आरोपी तेथून पसार झाला. काही वेळाने महिलेने पिशवी तपासली असता, त्यात खेळण्यातील नोटा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाणटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून, सहायक निरीक्षक कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *