![]()
साधना सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शासनाकडून पुरस्कार मिळाल्यानंतर सोमवारी (तारीख 11) जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सत्कार केला. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड म्हणाले की, हे यश केवळ माझे नसून, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे. सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच हिंगोली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहचू शकला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये ई-ऑफिस 100 टक्के पूर्ण करणे, कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी सर्व कार्यालये पूर्णपणे ई-ऑफिस प्रणालीवर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रलंबित प्रश्न, लोक आयुक्त मुद्दे, विधानसभा तारांकित प्रश्न आणि शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन ते तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदनाकार्ड वाटप आणि प्रशासकीय सुधारणांचा आढावा घेण्यात आला. सर्व विभाग प्रमुख यांनी क्षेत्रीय भेटी देऊन कामाचा आढावा घेण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. जिल्ह्याला पारितोषिक मिळवून देण्याचा निर्धार पुढील काळात राजीव गांधी गतिमान अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आणि मी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियाने यशस्वीपणे राबवून जिल्ह्याला पुन्हा सन्मान मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला.
Source link
हिंगोली जिल्हा परिषदेचा राज्यात डंका:'साधना सप्ताहा'त उत्कृष्ट कामगिरीबद्दल CEO विवेक गायकवाड यांचा सत्कार