Headlines

हळदीच्या शेतातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा 10 किमी अंतरावर सापडला मृतदेह:गुरुवारी होणार होता विवाह, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घटना




सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील भावी नवरदेवाचा मृतदेह 10 किलो मिटर अंतरावर असलेल्या आडगाव शिवारातील एका विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वायचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतदेहावर सोमवारी ता. 11 रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील ओम अशोक वायचाळ (26) हा तरुण शेती करतो. घरी एकुलता एक असल्यामुळे त्याची आई अन ओम असे दोघेच राहतात. त्याला तीन बहिणी असून त्यांचे विवाह झालेले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ओम याचा विवाह हिंगोली तालुक्यातील एका गावात ठरला होता. विवाह सोहळा ता. 10 मे रोजी होणार होता. मात्र त्यापुर्वीच ओमची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला वाशीम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे विवाह सोहळा ता. 14 मे रोजी ठरविण्यात आला होता. ओम याची प्रकृती चांगली झाल्यानंतर त्याच्या घरी विाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली सुरु होती. दरम्यान, गुरुवारी ता. 7 सायंकाळच्या सुमारास ओम घरी आला. त्यानंतर त्याने हातपाय घूवून जेवण केले अन शेतात हळदीकडे चक्कर मारून येतो असे सांगून घरातून निघाला होता. मात्र रात्री उशीरा पर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता. मात्र त्याचा कुठेही शोध लागला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात ओम बेपत्ता झाल्याचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी ता. 11 सकाळी आडगाव शिवारातील एका विहीरीमध्ये मृतदेह आढळून आला. बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, जमादार गजानन कऱ्हाळे, गजानन बेडगे, भडके यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता विहीरीतील मृतदेह ओम वायचाळ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला होता. सायंकाळी उशीरा मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री ओम याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वायचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत नोंद झाली नाही. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार मयत ओम याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अद्यापही उत्तरीय तपासणीचा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे या अहवालानंतरच मयत ओम याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *