![]()
पीएमपीएमएलमधील कथित भ्रष्टाचार, माहिती दडपशाही आणि बेकायदेशीर पदोन्नती प्रकरणांच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीने स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले. पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी पीएमपीएमएल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. माहिती अधिकारांतर्गत वारंवार अर्ज करूनही अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बेकायदेशीर पदोन्नती प्रकरणात वेतनवाढ थांबविण्यात आल्याचे प्रशासनाने मान्य केले असले तरी, संबंधित पदोन्नती अद्याप रद्द करण्यात आलेल्या नाहीत, असे आंदोलकांनी निदर्शनास आणले. समाजवादी पार्टीने दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची, बी. पृथ्वीराज यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल तातडीने जाहीर करण्याची तसेच स्टॅण्ड मॅनेजर आणि डेप्युटी अकाउंट ऑफिसर पदांवरील नियुक्त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. कामगारांना प्रलंबित वैद्यकीय सुविधा, २५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम तातडीने द्यावी आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया त्वरित राबवावी, अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. या आंदोलनात जांबुवंत मनोहर यांच्यासह दत्ता पाकिरे (शहर सरचिटणीस), शहाजहान झारी (शहर सचिव), अशोकराव गायकवाड (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), अझीम शेख (विभाग कार्याध्यक्ष), अजित जाधव, दस्तगीर शेख, दीपक पाटील आणि प्रसाद शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “पीएमपीएमएल प्रशासनाकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न सुरू असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असा इशारा जांबुवंत मनोहर यांनी यावेळी दिला.
Source link
पीएमपीएमएल कार्यालयासमोर समाजवादी पार्टीचे धरणे आंदोलन:भ्रष्टाचार, माहिती दडपशाही व कामगार प्रश्नांवर चौकशीची मागणी