![]()
द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे युवा कलाकार सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना यंदाचा द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी चरित्र कथन आणि स्वरचित काव्याद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कलाकारांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी आणि सचिव सुनेत्रा मंकणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त हरिभाऊ मिरासदार आणि प्रसाद मिरासदार उपस्थित होते. सुप्रसिद्ध साहित्यिक द. मा. मिरासदार यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे २०२३ पासून हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या सोहळ्याला भाजपाचे राज्य सरचिटणीस राजेश पांडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. इतिहासतज्ज्ञ राजा दीक्षित प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. पुरस्काराचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून, यात मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख एकवीस हजार रुपये असे स्वरूप आहे. द. मा. मिरासदार हे एक सुप्रसिद्ध कथालेखक, चित्रपटकथा व संवाद लेखक तसेच कथाकथनकार होते. त्यांनी २६ वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते आणि ते एक लोकप्रिय प्राध्यापक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या अनेकविध सामाजिक आणि कलाक्षेत्रातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या कार्याशी संबंधित क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना दिला जातो. यावर्षी द. मा. मिरासदार यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती रवींद्र मंकणी आणि सुनेत्रा मंकणी यांनी दिली.
Source link
सारंग मांडके, सारंग भोईरकर यांना द. मा. मिरासदार पुरस्कार:जन्मशताब्दीनिमित्त गौरव; वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन