Headlines

विकास लवांडे हल्ला प्रकरण: गंभीर कलमे वाढवण्यासाठी अर्ज:पूर्वनियोजित हल्ल्याचा दावा, 14 मे रोजी आदेश अपेक्षित




प्रवचनकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात हल्ल्यातील गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमे वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एस. बागल यांच्या न्यायालयात मंगळवारी हा अर्ज ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी दाखल केला. न्यायालयाने अर्ज विचारात घेतला असून, १४ मे रोजी आदेश देणार आहे. अर्जानुसार, आरोपी संग्राम भंडारे आणि १० ते १२ अनोळखी व्यक्तींनी पूर्वनियोजित कट रचून विकास लवांडे यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी रिव्हॉल्वर/बंदूक दाखवून दहशत निर्माण केल्याचा आणि ऑईलसदृश केमिकलच्या चार बाटल्या लवांडे यांच्या अंगावर ओतल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामुळे लवांडे यांच्या जिभेची चव जाणे, त्वचेवर जळाल्यासारखे चट्टे पडणे आणि डोळे दुखणे असे गंभीर शारीरिक परिणाम झाल्याचे अर्जात नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी “ये लवाडे, आता बघ फक्त शाईच फेकली, अजून काय काय होते ते बघ” अशा गंभीर धमक्या दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ शाईफेक नसून, जीव घेण्याच्या उद्देशाने केलेला संघटित आणि पूर्वनियोजित हल्ला असल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे. लोणीकाळभोर पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यात किरकोळ आणि अदखलपात्र स्वरूपाची कलमे लावली, ज्यामुळे आरोपींना तातडीने जामिनाचा लाभ मिळाला, असा गंभीर आरोप अर्जात केला आहे. घटनेतील तथ्ये, शस्त्राचा वापर, जीवघेण्या धमक्या आणि केमिकल हल्ल्याचे स्वरूप पाहता भारतीय न्याय संहिता १०९ बीएनएस अंतर्गत अधिक कठोर कलमे तसेच शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल होणे आवश्यक होते, असे फिर्यादीचे म्हणणे आहे. दरम्यान, कॅबिनेट मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील आणि इतर सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आरोपींच्या कृत्याला उघड समर्थन देत “तुम्ही बिनधास्त काही करा, आम्ही मंत्रालयात बसलोय” अशा प्रकारची वक्तव्ये केली. यामुळे आरोपींचे मनोबल वाढले असून, वातावरण दूषित होत असल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे. सदर प्रकरणात निष्पक्ष, सखोल व कायद्याच्या अधीन राहून तपास व्हावा, गंभीर कलमे वाढवावीत तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विकास लवांडे यांचे वकील अ‍ॅड.मिलींद पवार, अ‍ॅड सुयोग गायकवाड, ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, ॲड हर्षवर्धन पवार यांनी न्यायालयात अर्जाद्वारे करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *