![]()
शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सोनवणे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर दुसऱ्या दिवशी यश मिळाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत अपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करण्यात येऊन २० तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. साक्री-शिर्डी महामार्गावरील सुकड नाला ते बसस्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले असले तरी बसस्थानक ते जिजामाता उद्यान दरम्यानचा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. या भागात मोठमोठे खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी जयप्रकाश सोनवणे यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सोमवार (दि. ११) पासून शिवतीर्थ परिसरात उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असून, रस्ता दर्जेदार व टिकाऊ स्वरूपात तयार केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी पोलिस निरीक्षक योगेश पाटील व नागरिक उपस्थित होते. काम निकृष्ट झाल्यास पुन्हा आंदोलन करणार शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करत असल्याने हा रस्ता दर्जेदार व टिकाऊ असणे आवश्यक आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाले आणि रस्ता पुन्हा उखडला, तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जयप्रकाश सोनवणे यांनी दिला.
Source link
लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी सटाण्यात उपोषण मागे, साक्री-शिर्डी महामार्गाचे काम 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन