Headlines

पदासाठी तिसरा मुलगा लपवला; संभाजीनगर एमआयएम नगरसेवकाला अटक:मुलाला दाखवले पुतण्या; नगरसेवक मेहराज खान यांच्यासह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा




महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाइड सर्टिफिकेट तयार करून शासनाची, मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांना अटक करण्यात आली असून, त्याशिवाय नगरसेवकाची पत्नी निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील खान, इकरा मिनाज खान, सज्जू उस्ताद यांच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपींसोबत एक अल्पवयीन मुलागा होता. याअल्पवयीन मुलाच्या चौकशीतून या बनवेगिरीचे बिंग फुटले, असे पोलिसांनी सांगितले. मार्च 2026 मध्ये सिल्लेखाना परिसरातील जुन्या वादातून माजी नगरसेवक रफतयार खान यांच्यावर भररस्त्यात लोखंडी रॉड आणि बेसबॉलच्या बॅटने प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे करत होत्या. या हल्ल्याच्या वेळी घटनास्थळावरून एका 14 वर्षांच्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाकडे त्याच्या पालकांविषयी विचारणा केली असता, त्याने आपले वडील मिनाज खान आणि आई इकरा मिनाज खान असल्याचे सांगितले होते. बालकाच्या आधार कार्डवरही याच नावांची नोंद होती. मिनाज खान हा नगरसेवक मेहराज खान याचा भाऊ आहे. बाल न्याय मंडळासमोर सामाजिक पार्श्वभूमी अहवाल सादर करताना मुलाने हीच माहिती दिली होती. त्यामुळे त्याची रवानगी बालगृहात करण्यात आली होती. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून मेहराज खान यांनी निवडणूक लढवली होती. तिसरे अपत्य असल्याचे समोर आल्याने त्यांचे पद धोक्यात आले आहे. बोनाफाइड, जन्मदाखलाही बनावट पोलिसांच्या तपासादरम्यान हा अल्पवयीन मुलगा एका इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकत असल्याचे समोर आले. पोलिसांनी 27 मार्च रोजी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार करून त्याचे बोनाफाइड सर्टिफिकेट मिळवले. मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांनी दिलेल्या प्रमाणपत्रातही त्याच्या वडिलांचे नाव मिनाज खान असेच नमूद होते. मात्र, पोलिसांच्या तपासात आरोपी सज्जू उस्ताद याने या मुलाचा एक बनावट जन्मदाखला तयार करून दिल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात हा अल्पवयीन मुलगा मिनाज खान याचा नसून तो नगरसेवक मेहराज खान आणि निलोफर मेहराज खान यांचाच तिसरा मुलगा असल्याचे तपासात सिद्ध झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रतिज्ञापत्रात लपवली माहिती मेहराज खान जलील खान यांनी मनपा निवडणुकीत अर्जासोबत शपथपत्रात आपल्याला केवळ मुलगा आणि मुलगी अशी दोनच अपत्ये असल्याचे नमूद केले होते. तिसरे अपत्य असल्याचे समोर आले असते तर मेहराज खान हे दोनपेक्षा जास्त अपत्यांच्या नियमानुसार नगरसेवकपदासाठी अपात्र ठरले असते. स्वतःचे पद वाचवण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आरोपीने कुटुंबाशी आणि मुख्याध्यापकांशी संगनमत करून स्वतःच्या तिसऱ्या अपत्याला भावाचा मुलगा म्हणून कागदोपत्री दाखवले. या प्रकरणात सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिटी चौक ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *