Headlines

मध्यप्रदेशातून 25 लाखांची अवैध दारू जप्त:अमरावती ग्रामीणमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सहा आरोपींना अटक




अमरावती ग्रामीणमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून येणारी २५ लाख ३२ हजार ७७० रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी चिखलदरा मार्गावर करण्यात आली असून, यात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अवैध दारुला आळा घालण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिखलदरा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. याच दरम्यान, मध्यप्रदेशातून घटांग मार्गे विदेशी दारूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. काही वेळात तीन संशयित चारचाकी वाहने एकामागोमाग येताना दिसल्याने पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान, टोयोटा कार (एमएच ०१ बीबी ४०८८) मधून ‘ऑफिसर चॉईस’ कंपनीच्या विदेशी दारूचे ४५ बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० एमएलच्या ९६ सिलबंद बाटल्या होत्या. जप्त केलेल्या दारूची किंमत ३ लाख ७१ हजार ५२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत निगराणी ठेवण्यासाठी धावणारी महिंद्रा बोलेरो (एमपी १३ झेडपी २७९९) आणि एक कार (एमपी ४८ बीसी १७३८) ही इतर दोन वाहनेही जप्त करण्यात आली. आरोपींकडून १ लाख २५० रुपये रोख रक्कम आणि सहा मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले. या कारवाईत एकूण तीन चारचाकी वाहने, विदेशी दारू, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण २५ लाख ३२ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *