Headlines

Dharashiv Thackeray Group Action Against Defecting Councilors


धाराशिव जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून झालेल्या नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांच्या पक्षांतराचा वाद आता कायदेशीर वळणावर जाण्याची शक्यता आहे. मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्ष सोडलेल्या १३ नगरसेवक आणि चार पंचायत समिती सदस्यांविर

.

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या पक्षांतरावरून राजकीय वातावरण तापले आहे. कळंब नगर परिषद आणि धाराशिव शहरातील नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच त्यापैकी काही जणांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींनंतर आता ठाकरे गटाने थेट कायदेशीर मार्ग स्वीकारण्याची तयारी केली आहे.

मशाल चिन्हावर निवडून आले, मग पक्षांतर; कैलास पाटील म्हणाले…

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पक्षांतर केलेल्या सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. कळंबचे नगरसेवक, धाराशिवचे नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत, त्यामुळे पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कैलास पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी वकिलांशी चर्चा सुरू आहे. कायदेशीर बाबी तपासून संबंधित सदस्यांविरोधात योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल. सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेसंदर्भात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मात्र, या अर्जावर वेळेत निर्णय झाला नाही तर ठाकरे गट न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.

‘तीन महिन्यांत निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयात जाऊ’

कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरही विलंब झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल केल्यानंतर त्याचा तीन महिन्यांत निकाल लागावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत असलेल्या लोकांकडून प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणला जाऊ शकतो, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे संबंधित प्रकरणाचा निर्णय ठरावीक कालमर्यादेत घेण्याचे निर्देश मिळावेत, यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यापुढेही आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे धाराशिवमधील पक्षांतराचा वाद आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता न्यायालयीन संघर्षात बदलण्याची शक्यता आहे.

‘शिवसैनिक आणि मतदारांशी घात केला’

पक्षांतर केलेल्या नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांवर टीका करताना कैलास पाटील यांनी या लोकांनी शिवसैनिक आणि सर्वसामान्य मतदारांशी घात केल्याचा आरोप केला. मशाल चिन्हावर निवडून येताना मतदारांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे हा मतदारांच्या विश्वासाशी संबंधित प्रश्न असल्याची भूमिका ठाकरे गटाकडून मांडली जात आहे. याच आधारावर संबंधित सदस्यांना अपात्र करण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं?

धाराशिव शहरातील नगरसेवकांच्या पक्षांतरावरून काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम या नगरसेवकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र, हे नगरसेवक इंदापूरपर्यंत पोहोचल्यानंतर घडामोडींना अचानक कलाटणी मिळाली. मुंबईऐवजी त्यांनी धाराशिवकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगितले जाते. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्या घडामोडीमुळे भाजपकडून सुरू असलेल्या संभाव्य ‘ऑपरेशन लोटस’ला शिवसेनेच्या माध्यमातून ‘ऑपरेशन टायगर’ने उत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

कळंबमध्येही ठाकरे गटाला धक्का

धाराशिव शहराबरोबरच कळंब नगर परिषदेतही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कळंबमधील ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांनी पक्षांतर केल्याचे सांगितले जात आहे. धाराशिव शहरातील चार नगरसेवकांच्या पक्षांतराची भर पडल्याने एकूण १३ नगरसेवकांविरोधात कारवाईची तयारी सुरू असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले आहे. याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील चार पंचायत समिती सदस्यांनीही पक्षांतर केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

20 लाख ते एक कोटीपर्यंत बोली; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षांतरामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी नगरसेवक फोडण्यासाठी २० लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत बोली लावल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना पक्ष बदलायचा असेल तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, नगरसेवकांच्या पक्षांतरासाठी आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपांना अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या आरोपांमागील सत्यता काय, हा स्वतंत्रपणे तपासाचा विषय आहे.

पक्षांतरानंतर मतदारांचा संताप; बॅनरबाजीने वातावरण तापले

नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिव शहरातील काही भागांत मतदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. काही नगरसेवकांच्या घरांसमोर पक्षांतराचा निषेध करणारे बॅनर झळकले होते. ‘एक खोका, मतदाराला धोका’, ‘आमचे मत आम्हाला परत द्या’, ‘एक कोटींचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’ अशा आशयाच्या घोषणा या बॅनरवर करण्यात आल्या होत्या. यामुळे पक्षांतराचा मुद्दा आता स्थानिक मतदारांच्या रोषाचा विषय बनल्याचे चित्र आहे. विशेषतः ज्या चिन्हावर मतदारांनी उमेदवाराला निवडून दिले, त्याच पक्षातून निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्षात जाणाऱ्या नगरसेवकांविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

ठाकरे गटाची बैठक; कार्यकर्ते आक्रमक

नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गटाने धाराशिवमध्ये बैठक घेतली. आमदार कैलास पाटील आणि पक्षाच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षांतराच्या मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढण्यासोबतच आगामी काळात राजकीय पातळीवरही या नगरसेवकांना आणि त्यांना पक्षात घेणाऱ्या नेत्यांना उत्तर देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

आता काय होणार?

धाराशिवमधील या संपूर्ण राजकीय संघर्षात पुढचा टप्पा कायदेशीर कारवाईचा असणार आहे. ठाकरे गट जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेसाठी अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर या अर्जावर काय निर्णय होतो, यावर पुढील राजकीय आणि न्यायालयीन घडामोडी अवलंबून राहतील. जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित कालावधीत निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचीही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे धाराशिवमधील नगरसेवकांची पळवापळवी आता ‘अपात्रता विरुद्ध पक्षांतर’ अशा कायदेशीर संघर्षात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. एका बाजूला सत्ताधारी महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांच्या पक्षांतराला कायदेशीर आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी काळात धाराशिवच्या राजकारणात आणखी कोणते धक्कादायक निर्णय होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीचा थरार: भाजप प्रवेशासाठी निघालेले नगरसेवक रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत; शहरात ‘एक खोका, मतदाराला धोका’ बॅनरबाजी

धाराशिव शहराच्या राजकारणात नगरसेवकांच्या पक्षांतरावरून मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यासाठी महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच तीव्र चढाओढ पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे निघालेले नगरसेवक वाटेतूनच अचानक माघारी फिरले आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून थेट ठाण्यात पोहोचत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या नाट्यमय घडामोडीनंतर धाराशिव शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात स्थानिक मतदारांनी थेट घरासमोर फलक लावून तीव्र संताप व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.