Headlines

E20 इंधनावर पुण्यात ‘टाउन हॉल’ आयोजित:मायलेज घट, देखभाल खर्चात वाढीच्या तक्रारींवर होणार चर्चा




पुण्यात १४ ऑगस्ट रोजी E20 इंधनाच्या सक्तीच्या वापराबाबत महाराष्ट्र राज्यस्तरीय ‘टाउन हॉल’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचे प्रश्न, वाहनधारकांचे प्रत्यक्ष अनुभव आणि वाहनांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे पदाधिकारी विजय कुंभार, डॉ. अभिजित मोरे यांच्यासह अमित हस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे, संजय कोने, सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर उपस्थित होते. या टाउन हॉलमध्ये E20 धोरणाची अंमलबजावणी घाईघाईने, पुरेशी तयारी न करता आणि वाहनधारकांच्या हिताचा पुरेसा विचार न करता करण्यात आली का, हा प्रमुख प्रश्न उपस्थित केला जाईल. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्यानंतरही ग्राहकांना पेट्रोल स्वस्त मिळालेले नाही. उलट, काही वाहनधारकांकडून कमी मायलेज आणि वाढलेल्या देखभाल खर्चाच्या तक्रारी येत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या चर्चेत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळल्यानंतरही किमतीत अपेक्षित घट का झाली नाही, कमी मायलेजमुळे वाढलेल्या वाहनधारकांच्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार, जुन्या वाहनांवर E20 चा काय परिणाम होतो आणि त्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, असे प्रश्न चर्चिले जातील. तसेच, पुरेशी पूर्वतयारी आणि संक्रमणाचा कालावधी न देता E20 ची अंमलबजावणी का करण्यात आली, यावरही सरकारकडून उत्तर मागितले जाईल. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी E20 ला तत्त्वतः विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पुरेशा अभ्यासानंतरच त्याची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. इंधनाचे विविध पर्याय उपलब्ध करून देतानाच दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली. ऊसापासूनच्या इथेनॉल उत्पादनाचा वाटा २०२०-२१ मधील ८६ टक्क्यांवरून सध्या ३३ टक्क्यांपर्यंत घसरल्याचा दावा करत, सरकारचे बदललेले धोरण शेतकरीधार्जिणे आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉ. अभिजित मोरे आणि मुकुंद किर्दत यांनी वाहनांच्या तांत्रिक सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित केला. विशेषतः २०२३ पूर्वीच्या वाहनांमध्ये E20 वापरामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांना दर्जेदार इंधन, योग्य मायलेज आणि पारदर्शक माहिती मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *