![]()
देशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या ‘आयआयटी मुंबई’ मधील बी.टेक. शाखेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संशयास्पद आत्महत्येचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. “साहिल वाकोडेचा मृत्यू ही साधी आत्महत्या नसून शिक्षण व्यवस्थेतील जातीय मानसिकतेतून झालेली ‘संस्थात्मक हत्या’ आहे,” असा गंभीर आरोप करत काँग्रेस आणि एनएसयूआयने आज आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी मोठी धरपकड मोहीम राबवून वर्षा गायकवाड यांच्यासह डझनभर प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे शाखेकडून सुरू असलेला तपास थांबवून केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. IIT पवई परिसराला छावणीचे स्वरूप; आंदोलकांची धरपकड साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर आयआयटी कॅम्पसबाहेर विद्यार्थ्यांचा आणि विविध संघटनांचा रोष सातत्याने वाढत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवई पोलिसांनी आयआयटीच्या सर्व प्रवेशद्वारांवर ४०० ते ५०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करून संपूर्ण परिसराला छावणीचे रूप दिले होते. पोलिसांनी खासदार वर्षा गायकवाड यांना आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ताब्यात घेतल्यानंतरही दर 15 मिनिटांनी एनएसयूआय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गेटवर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी भरलेल्या अनेक व्हॅन्स तत्काळ ताब्यात घेऊन परिसर मोकळा केला. वारंवार होणाऱ्या निदर्शनांमुळे पवई-कांजूरमार्ग मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शिक्षणाचे RSSकरण आणि जातीय छळाचे नेक्सस; वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्र व राज्य सरकारसह आयआयटी प्रशासनावर अत्यंत घणाघाती आरोप केले. “साहिलचा मृत्यू हा निव्वळ अपघात किंवा वैयक्तिक तणावातून झालेली आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेली हत्या आहे. देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा मानसिक छळ केला जातो.” “आयआयटीसारख्या स्वायत्त व तंत्रज्ञान संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीचा शिरकाव झाला असून शिक्षणाचे पद्धतशीरपणे ‘आरएसएसकरण’ सुरू आहे. यामुळेच कॅम्पसमध्ये धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभावाला खतपाणी मिळत आहे. रोहित वेमुला प्रकरणापासून आजतागायत आयआयटी मुंबईत घडलेली ही चौथी घटना आहे; तरीही एकावरही कठोर कारवाई होत नाही. प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठवून चालणार नाही, तर संबंधित प्राध्यापक आणि डीनवर तत्काळ निलंबनाची आणि कठोर गुन्हेगारी कारवाई झाली पाहिजे.” राहुल गांधींकडून कुटुंबीयांचे सांत्वन या प्रकरणाची थेट राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी साहिल वाकोडे यांच्या शोकाकुल कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. “साहिलच्या मृत्यूची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष ही लढाई रस्त्यापासून संसदेपर्यंत लढेल,” असा विश्वास राहुल गांधी यांनी कुटुंबीयांना दिला. साहिलच्या आई-वडिलांनी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन दाद मागितली आहे. आत्महत्येपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज समोर दरम्यान, साहिल वाकोडेच्या आत्महत्येच्या काही वेळ आधीचा परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमध्ये साहिल परीक्षा केंद्रातील पुढील बाकावर शांतपणे पेपर लिहीत बसल्याचे दिसते. त्याच्या अवतीभोवती दोन ते तीन प्राध्यापक/पर्यवेक्षक वावरताना दिसत आहेत. एक प्राध्यापक साहिलच्या बाकाजवळ येऊन त्याला काहीतरी विचारतात आणि त्याच्याकडून काही संशयित बाबी तपासल्या जातात. त्यानंतर काही मिनिटांतच साहिल अत्यंत तणावाखाली बाकावरून उठून वर्गाबाहेर जातो आणि त्याच्या मागोमाग शिक्षकही जाताना दिसतात. कॉपीच्या संशयावरून त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली आणि जातिवाचक शेरेबाजी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले गेले, असा गंभीर आरोप कुटुंबीय आणि विद्यार्थी संघटनांनी केला आहे. क्राइम ब्रँचऐवजी ‘CBI’ चौकशीची मागणी का? मुंबई पोलिसांनी हे प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्याकडून काढून गुन्हे शाखेकडे वर्ग केले असले, तरी काँग्रेसने त्यावर अविश्वास दाखवला आहे. “देशभरातील अनेक उच्च शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा छळ करणारे एक मोठे ‘नेक्सस’ (जाळे) कार्यरत आहे. स्थानिक पोलिसांवर प्रशासकीय व राजकीय दबाव येऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी या प्रकरणाची सीबीआयमार्फतच निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका एनएसयूआयच्या प्रतिनिधींनी मांडली आहे. ———————– हेही वाचा… IIT-बॉम्बेच्या विद्यार्थ्याने मृत्यूपूर्वी मैत्रिणीला फोन केला : परीक्षेचा उल्लेख करत म्हणाला- माझ्याकडून चूक झाली, काल परीक्षा हॉलचे सीसीटीव्ही फुटेज समोर आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने मृत्यूच्या काही तास आधी फोनवर आपल्या जवळच्या मैत्रिणीशी बोलले होते. माध्यमांच्या वृत्तांनुसार, संभाषणात त्याने थर्मोडायनॅमिक्सचा पेपर खराब गेल्याचे आणि “आता हे होऊन जाऊ दे” असे म्हटले होते. त्याने असेही सांगितले होते- माझ्याकडून चूक झाली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
IIT मुंबईबाहेर काँग्रेसचा एल्गार:वर्षा गायकवाडांसह कार्यकर्त्यांची धरपकड, साहिल वाकोडे प्रकरणात CBI चौकशीची मागणी