Headlines

हिंगोलीत SIR मधील 35 हजार मतदारांच्या सुनावणीसाठी 50 अधिकारी नियुक्त:निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती




हिंगोली जिल्हयात मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार यादीतील नावात जुळवणी व इतर कारणांवरून ३५ हजार मतदारांना नोटीस पाठविण्यात आल्या असून त्यांच्या सुनावणीसाठी ५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांनी गुरुवारी ता. २४ दिली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी चोंडेकर यांनी माहिती दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात बीएलओमार्फत प्रत्येक मतदारांशी संपर्क करण्यात आला आहे. यामध्ये स्थलांतर, मृत झालेल्या मतदारांचे मॅपींग झाले नाही. याशिवाय सुमारे ३५ हजार मतदारांची नांवे सन २००२च्या मतदार यादीतील त्यांच्या नातेवाईकाच्या नावासोबत जुळली नाही. त्यामुळे या ३५ हजार मतदारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघातील सुमारे ८ हजार ९००, वसमत विधानसभा मतदार संघातील १४५६५, कळमनुरी विधानसभा मतदार संघातील ११५३२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांना नोटीस पाठवून त्यांना दिलेल्या तारखेला आवश्‍यक पुरावे घेऊन सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये संबंधित मतदारांनी कोठे हजर रहावे त्यांची सुनावणी कोण घेणार आहे, याची सविस्तर माहिती देखील या नोटीसमध्ये नमुद करण्यात आली आहे. या मतदारांच्या सुनावणीसाठी जिल्हयात ५० अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित मतदारांनी नोटीस मिळाल्यानंतर त्यांना दिलेल्या तारीख व वेळेत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी चोंडेकर यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *