“मी वयाचा मान राखून आजवर शांत राहिलो, पण रामदास कदम यांनी पातळी सोडून माझ्या वैयक्तिक गोष्टींवर चिखलफेक करणे तत्काळ थांबवावे. आंतरवालीत आमच्याच आंदोलनात माणसे पेरून, आमच्या पाठीमागून फोटो गोळा करायला रामदास कदम तुम्ही काय फोटोग्राफर होता काय? एकनाथ श
.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर ‘शिंदेंना संपवण्याची सुपारी’ घेतल्याचा आरोप करत प्रसाद लाडांसोबतचे जेवणाचे फोटो आणि खोकल्याच्या औषधाची बाटली दाखवली होती. त्यावर तातडीने पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला.
तारीख तुम्हाला आधीच कशी समजली?; हे तर महाभयंकर गौडबंगाल!
ऑडिओ क्लिपच्या तारखेवरून रामदास कदम यांच्यावर बोट ठेवत जरांगे पाटील म्हणाले, “टीव्हीवर क्लिप वाजण्याच्या 3 तास आधीच रामदास कदमांना ती कधीची आहे, तिची तारीख काय आहे हे आधीच कसे समजले? 32 मिनिटांच्या क्लिपमधील वेळ आणि तारीख कदमांना अगोदरच कशी माहिती झाली, हे फार मोठे गौडबंगाल आहे. यावरून स्पष्ट होते की आमच्यात फूट पाडण्यासाठी आणि शिंदे-फडणवीसांच्या विरोधात अंतर्गत कारस्थाने करण्यासाठी जी टीम काम करत होती, त्या टीमचे सूत्रधार रामदास कदम स्वतःच असावेत.”
तपास यंत्रणांनी शोध घ्यावा
“मला ही क्लिप कोणी दिली याने तुम्हाला काय देणंघेणं? मी कोणाचीही मालकी पत्करलेली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तपास यंत्रणा आहेत, ते त्याचा शोध घेतील. पण ज्या अर्थी कदमांना सर्व आतील माहिती आधीच होती, त्यावरून या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे कदमांपर्यंत पोहोचतात हे उघड झाले आहे.”

पाठीमागून फोटो काढायला तुम्ही काय फोटोग्राफर होता?
पत्रकार परिषदेत दाखवलेल्या फोटोंवर संताप व्यक्त करत जरांगे म्हणाले, “अंतरवलीमध्ये लाखो लोक मला भेटायला येतात. त्यातील कोणीतरी पाठीमागून फोटो काढला आणि कदमांनी तो पत्रकार परिषदेत झळकावला. पाठीमागून फोटो काढून माणसांची ओळख पटते का? मला मिशा आहेत, चेहऱ्यावरून माणूस ओळखता येतो. याचा अर्थ कदमांनी गेल्या 3 वर्षांपासून आमच्या आंदोलनात स्वतःचे हेर पेरले होते. आमची पोरं फोडून, गद्दार तयार करून असले फोटो गोळा करण्याचे उद्योग कदम करत होते, हे आता सिद्ध झाले आहे.”
नाव उघड करण्याचे आव्हान
“कदमांमध्ये हिंमत असेल तर त्या माणसाचे नाव त्यांनी जाहीर करावे. त्या गद्दाराला लोकांसमोर उभे करा, हवेत गोळीबार करू नका. त्या व्यक्तीने मला काय दिले, त्याचे नाव काय, हे महाराष्ट्रासमोर सांगा. फुकटच्या धमक्या देऊन घाबरवण्याचे दिवस आता संपले आहेत.”
खोकल्याच्या औषधाची बाटली अन् प्रसाद लाडांसोबतच्या जेवणावळींवर प्रत्युत्तर
औषधाची बाटली दाखवून केलेल्या संशयास्पद दाव्यांची खिल्ली उडवत जरांगे म्हणाले, “खोकल्याच्या औषधाची बाटली दाखवून कदम काय सिद्ध करू पाहत आहेत? ती बाटली कसली आहे, औषधाची आहे, दारूची आहे की रोगरची आहे, हे तुम्हीच एकदा पिऊन तपासा, म्हणजे चव कळेल! उपोषणाला बसलेल्या माणसाला बदनाम करण्यासाठी असली चिल्लर कारस्थाने करताना लाज वाटली पाहिजे. आमच्यात माणसे घुसवून असले प्रकार रचणाऱ्यांचीच ही कारस्थाने आहेत.”
प्रसाद लाडांशी चहा-पाणी केले तर बिघडले कुठे?
“प्रसाद लाड यांच्यासोबत जेवणाचे फोटो दाखवता? अहो, आंदोलनादरम्यान शंभूराज देसाई, उदय सामंत यांच्यासह अनेक नेते आले, त्यांनी चहा घेतला, जेवण केले. लाडांसोबत बसलो म्हणजे काय त्यांच्या बोकांडी बसलो का? इतकी जळकी वृत्ती का? उद्धव ठाकरेंना जसे तुम्ही बेजार केले, तसेच आता एकनाथ शिंदेंनाही बेजार करून शिवसेना संपवण्याचा विडा कदमांनी उचलला आहे का?”
शिंदेंच्या पाठीमागे साडेसाती तुम्हीच लावली; आम्ही तर त्यांना सावध केले!
एकनाथ शिंदेंविरोधातील कथित षड्यंत्रावर बोलताना जरांगेंनी थेट भूमिका मांडली. “आम्हाला जर एकनाथ शिंदे यांना संपवायचे असते, तर आम्ही ही क्लिप जाहीर करून त्यांना सावध केले असते का? क्लिपमध्ये एक महिला उघडपणे बोलते की श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटी रुपये गेले. यातून शिंदेंची आणि त्यांच्या पुत्राची बदनामी कोण करत होते, हे समोर आणण्याचे काम आम्ही केले. हे काम खरेतर पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून कदमांनी करायला हवे होते. मात्र, कदमांनी ते न करता उलट शिंदेंच्या पाठीमागे साडेसाती लावून त्यांचे नुकसान करण्याचे काम चालवले आहे.”
शेवटचा इशारा
“रामदास कदम यांनी वयाचा विचार करावा. नारायण राणेंचा जसा आदर करतो, तसा तुमचाही करत होतो. मात्र, एका मराठा नेत्याचे करिअर संपवण्यासाठी आणि सत्तेसाठी जर तुम्ही माझ्या नादी लागत असाल, तर याद राखा. यापुढे माझ्याविरोधात असे चिल्लर आरोप केले तर मी सोडणार नाही. एकनाथ शिंदेंनी स्वतः अशा वाचाळवीरांना पत्रकार परिषदा घेण्यापासून रोखावे, अन्यथा मराठा समाज कोणालाही माफ करणार नाही.”
————————————————————————–
हेही वाचा…
एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचे हे भाजपचेच कारस्थान?: रामदास कदमांचा मनोज जरांगेंवर खळबळजनक आरोप, प्रसाद लाड यांच्यावरही निशाणा

“मराठा आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील अखंड समाजाची दिशाभूल करत आहेत. एका बाजूला स्वतःच्या गुप्त बैठकांमध्ये भाजप आमदाराला सोबत बसवून ‘येथे बसलेल्यांपैकी 70 टक्के लोक एकनाथ शिंदेंचे चमचे आहेत’ अशी गरळ ओकायची आणि दुसऱ्या बाजूला भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून जेवणावळी झोडायच्या, हा जरांगेंचा खरा चेहरा आहे. ही 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप एआय (AI) नसून भाजपचीच रणनीती आहे. स्वतःच्याच मित्रपक्षातील नेत्याची ताकद वाढल्याने एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचे काम भाजपमधील ‘अस्तीनचे साप’ करत आहेत का? याचे उत्तर आता भारतीय जनता पक्षाला द्यावेच लागेल,” असा खळबळजनक हल्लाबोल शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी