“मराठा आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील अखंड समाजाची दिशाभूल करत आहेत. एका बाजूला स्वतःच्या गुप्त बैठकांमध्ये भाजप आमदाराला सोबत बसवून ‘येथे बसलेल्यांपैकी 70 टक्के लोक एकनाथ शिंदेंचे चमचे आहेत’ अशी गरळ ओकायची आणि दुसऱ्या बाजूला भाजप आमदार प्रसा
.
मुंबईत घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचे एकत्र जेवतानाचे आणि स्वागत करतानाचे थेट फोटो माध्यमांसमोर झळकावले. याचवेळी त्यांनी खोकल्याच्या औषधाची एक बाटली उंचावून दाखवत जरांगेंच्या उपोषणावर व अंतर्गत व्यवहारांवर गूढ सवाल उपस्थित केले.
प्रसाद लाड आणि जरांगेंच्या जेवणावळींचे फोटो उघड
पत्रकार परिषदेत थेट छायाचित्रे दाखवत रामदास कदम यांनी जरांगेंवर टीका करताना म्हटले की, “जरांगे पाटील, हे तुमचे जिवाभावाचे मित्र भाजप आमदार प्रसाद लाड बघा! तुमच्या शेजारी बसून जेवतायत, पुष्पगुच्छ देऊन तुमचे स्वागत करतायत आणि खांद्याला खांदा लावून गप्पा मारतायत. ज्या बैठकीत तुम्ही ‘येथे 70 टक्के एकनाथ शिंदेंचे चमचे बसलेत’ असे म्हणालात, त्या बैठकीत भाजपचे हेच आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.”
बाळासाहेब इंगळेंनी फटकारले
“जरांगे यांनी शिंदेंना ‘चमचे’ म्हटल्यानंतर त्या बैठकीत बसलेले मराठा समाजाचे बाळासाहेब इंगळे ताडकन उभे राहिले आणि त्यांनी जरांगेंना ‘तुम्ही एकनाथ शिंदेंविरोधात बोलणार असाल तर आम्ही निघालो’ असे तोंडावर सुनावले. मराठा समाजाने जरांगेंना डोक्यावर घेतले, मात्र आता हे टेंडर्स, जमिनी आणि राजकीय सुपाऱ्यांच्या नादात स्वतःच्याच समाजातील मोठ्या नेत्याला संपवायला निघाले आहेत.”
खोकल्याच्या औषधाची बाटली दाखवत गूढ इशारा
पत्रकार परिषदेत कदम यांनी एक औषधाची बाटली टेबलवर ठेवत जरांगेंना थेट आव्हान दिले. “ही बाटली ओळखता का जरांगे? हे कसले औषध आहे ठाऊक आहे का? या खोकल्याच्या औषधाचा आणि तुमच्या उपोषणाचा कधी काही संबंध आला आहे का? मला जास्त तोंड उघडायला लावू नका. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगा की या बाटलीशी तुमचा संबंध आला आहे की नाही?”,

माझ्याकडे पुरावे भक्कम
“माझा इतिहास तपासा, मी कधीही हवेत गोळीबार करत नाही. मी 32 वर्षे आमदार राहिलोय आणि 15 ते 20 वर्षे मंत्रिपद सांभाळले आहे. गृहखाते कसे चालते हे मला चांगले ठाऊक आहे. योग्य वेळ आल्यावर जरांगेंचे आणखी मोठे कारनामे बाहेर काढीन.”
32 मिनिटांची क्लिप AI नाही, ती भाजपचीच
ऑडिओ क्लिपच्या सत्यतेवरून भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या ‘AI’ तंत्रज्ञानाच्या दाव्याचा समाचार घेत कदम म्हणाले, “अंगाशी आल्यावर आता भाजपचे लोक म्हणतात की ही ऑडिओ क्लिप AI निर्मित आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. ही तब्बल 32 मिनिटांची अंतर्गत परिषद आहे. त्यामध्ये एकमेकांची नावे घेतली जात आहेत. दुपारी 3 वाजून 4 मिनिटांची वेळ त्यावर स्पष्ट दिसत आहे. प्रवीण दरेकरांचे नाव घेऊन मराठा पोरं जोडून देण्याची, पक्षाऐवजी परस्पर फंड पुरवण्याची आणि नॅरेटिव्ह सेट करण्याची सविस्तर चर्चा त्यात आहे.”
पंतप्रधान, गृहमंत्री आणि मोहन भागवतांना पत्र
“एकनाथ शिंदे यांनी प्रामाणिकपणे भाजपशी युती केली. पण शिंदेंची लोकप्रियता वाढल्याने भाजपच्या पोटात गोळा आला आहे का? एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचे काम भाजपमधील कोणती मंडळी करत आहे? या क्लिपमधील संभाषणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. युतीतील हे ‘अस्तीनचे साप’ लोकांसमोर आलेच पाहिजेत.”
क्लिप मला जरांगेंच्याच मावळ्याने दिली; छत्रपतींची शपथ घेऊन सांगा
कदम यांनी पुढे स्पष्ट केले की, “माझ्या मुलाकडे (योगेश कदम) गृहखाते आहे म्हणून मी याचा गैरवापर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, ही संपूर्ण ऑडिओ क्लिप जरांगेंसोबत खांद्याला खांदा लावून दिवस-रात्र फिरणाऱ्या त्यांच्याच एका निष्ठावंत मराठा मावळ्याने माझ्या हाती आणून दिली आहे. जरांगेंनी स्वतः तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगावे की त्यांना ही क्लिप कोणी आणि कधी दिली?”
शेवटी राज ठाकरे यांच्या दुष्काळ दौऱ्याचे स्वागत करताना कदम म्हणाले, “राज ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या मुख्य नेत्याच्या मुळावर उठण्याचे पाप त्वरित थांबवावे, अन्यथा जनता त्यांना कदापि माफ करणार नाही.”
————————————–
हेही वाचा…
रामदास कदमांना ऑडिओ क्लिपची तारीख कशी माहीत झाली?:क्लिप एआयची नाही, रेकॉर्डिंग खरी आहे; सत्य लपवू नका, कदमांच्या कॉल डिटेल्सची चौकशी झाली पाहिजे – मनोज जरांगे

एकनाथ शिंदे यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ती ऑडिओ क्लिप कधीची आहे, याची तारीख जाहीर केली. त्यांना ही तारीख कशी काय माहिती झाली? रामदास कदम आणि त्यांचा मुलगा लोकांना संभ्रमात टाकत असून ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कदमांकडे ही तारीख आली कशी? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा छडा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लावला पाहिजे, असे ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी