‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET) परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ‘टक्केवारी’ (Percentage) आणि ‘पर्सेंटाईल’ (Percentile) यातील गल्लत टाळण्याचे आवाहन केले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या
.
‘पर्सेंटाइल’ म्हणजे काय?
तुलनात्मक कामगिरी: ‘पर्सेंटाईल’ हे तुम्हाला परीक्षेत नेमके किती ‘गुण’ मिळाले, हे सांगत नाही. तर, तुमच्यासोबत परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्ही किती जणांच्या पुढे आहात, हे पर्सेंटाईल दर्शवते.
सोपे उदाहरण: समजा तुम्हाला ’90 पर्सेंटाईल’ मिळाले आहेत. याचा अर्थ तुम्हाला 90% मार्क मिळाले आहेत, असा अजिबात होत नाही. याचा अर्थ असा होतो की, परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 90% विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला जास्त गुण मिळाले आहेत. तुम्ही त्या बॅचमधील वरच्या (Top) 10% विद्यार्थ्यांमध्ये आहात.
‘टक्केवारी’ (Percentage) आणि ‘पर्सेंटाईल’ यातील फरक
टक्केवारी (Percentage): ही तुम्हाला मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांवर आधारित असते. उदा. 100 पैकी 80 गुण मिळाले, तर तुमची टक्केवारी 80% झाली.
पर्सेंटाईल (Percentile): हे इतरांच्या तुलनेत तुमची रँक किंवा स्थान निश्चित करते.
सीईटी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या विद्यार्थ्याला 170 किंवा 180 मार्क मिळाले असतील, तर टक्केवारीनुसार ते 80% असू शकतात. पण तो विद्यार्थी त्याच्या बॅचमध्ये सर्वात हुशार किंवा टॉपरच्या जवळ असेल, तर त्याचे ‘पर्सेंटाईल’ 99 किंवा 100% असू शकते.
सीईटीमध्ये पर्सेंटाईल कसे काढले जाते? (Normalisation Process)
सीईटीसारख्या मोठ्या परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी बसतात आणि परीक्षा एकाच दिवशी न होता अनेक दिवस, वेगवेगळ्या ‘शिफ्ट्स’ मध्ये घेतली जाते.
काठिण्य पातळीतील फरक: प्रत्येक शिफ्टचा पेपर वेगळा असतो, त्यामुळे एखादा पेपर सोपा तर एखादा कठीण असू शकतो. कठीण पेपर आलेल्या शिफ्टमधील हुशार विद्यार्थ्यालाही कमी गुण मिळू शकतात.
नॉर्मलायझेशन : हा अन्याय टाळण्यासाठी, प्रत्येक शिफ्टमधील टॉपर विद्यार्थ्याला 100 पर्सेंटाईल दिले जाते. त्यानंतर त्या शिफ्टमध्ये इतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची टॉपरच्या गुणांशी तुलना करून त्यांचे पर्सेंटाईल काढले जाते.
फॉर्म्युला: एका शिफ्टमध्ये जितक्या विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा कमी किंवा तुमच्याएवढेच गुण मिळाले आहेत, त्या संख्येला त्या शिफ्टमध्ये बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येने भागले जाते आणि त्याला 100 ने गुणले जाते. उदा. एका शिफ्टमध्ये 10,000 विद्यार्थी बसले. तुमच्यापेक्षा कमी गुण मिळवणारे 9,000 विद्यार्थी असतील, तर तुमचे पर्सेंटाईल (9000/10000)100 = 90% पर्सेंटाईल येईल.
बारावीचे मार्क कमी आणि सीईटीला 100 पर्सेंटाईल कसे?
सीईटी आयुक्तांनी हा संभ्रम दूर करताना दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत…
परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे: बारावीची परीक्षा ही वर्णनात्मक (Descriptive) असते, तर सीईटी ही बहुपर्यायी (MCQ) असते. दोन्ही परीक्षांसाठी लागणारी कौशल्ये (Skill Sets) वेगळी आहेत. त्यामुळे एका परीक्षेत कमी गुण मिळवणारा विद्यार्थी दुसऱ्या पद्धतीच्या परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतो.
सीईटीवरच लक्ष केंद्रित: अनेक विद्यार्थी सध्या केवळ स्पर्धा परीक्षांवर (NEET, JEE, CET) लक्ष केंद्रित करतात. ते बारावीची परीक्षा केवळ ‘पात्रता’ (Qualify) मिळवण्यापुरतीच देतात, त्यामुळे त्यांना तिथे कमी टक्केवारी मिळते, पण सीईटीमध्ये ते उत्तम पर्सेंटाईल मिळवतात.
पर्सेंटाईल ही एक वैज्ञानिक पद्धत (Normalisation) असून, ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समान पातळी (Level Playing Field) निर्माण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळेच, 35-40 टक्केवारी (Percentage) असणाऱ्या विद्यार्थ्यालाही सीईटीमध्ये त्याच्या बॅचमधील इतरांच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्यास 90-99 ‘पर्सेंटाईल’ मिळू शकते.
‘आउटलायर’ विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प
सरदेसाई यांनी सांगितलं की, यंदा सुमारे 4.63 लाख विद्यार्थ्यांनी CET परीक्षा दिली. त्यापैकी केवळ 2.35 लाख विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत (CAP) सहभागी झाले. उर्वरित 2.29 लाख विद्यार्थ्यांपैकी 25 हजार विद्यार्थ्यांना 80 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळाले असून 95 पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळवूनही 4,319 विद्यार्थी CAP प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत.
फक्त काही निवडक विद्यार्थ्यांच्या उदाहरणांवरून संपूर्ण निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. अशा प्रकारचे ‘आउटलायर’ प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आढळतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ऑडिओ आणि आरोपांची होणार तपासणी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत CET सेलने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली. पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या निकालाचं आणि उपलब्ध डेटाचं पुन्हा विश्लेषण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, सध्याच्या विश्लेषणातून कोणताही गैरव्यवहार झाल्याचं दिसून आलेलं नसल्याचा दावा त्यांनी केला.
विरोधकांचे आरोप कायम
दरम्यान, काँग्रेसचे सचिन सावंत यांनी सर्वप्रथम MHT-CET निकालावर प्रश्न उपस्थित करत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च पर्सेंटाईल कसे मिळाले, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी राज्यात अनेक भरती परीक्षा आणि प्रश्नपत्रिका फुटल्याचा उल्लेख करत CET प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत निकालातील कथित अनियमिततेकडे लक्ष वेधलं. मात्र या व्हिडिओतील दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुढे सरकार किंवा परीक्षा प्राधिकरण कोणती भूमिका घेते, याकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातमी वाचा..
NEET सारखाच घोटाळा MH-CET परीक्षेतही!: बारावीला 35-40 टक्के असणाऱ्यांना CET मध्ये 100 पर्सेंटाईल कसे? सचिन सावंतांचा सवाल

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आणखी एक गंभीर गौप्यस्फोट केला आहे.
सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर जर तरुण पिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूक आहे. नीट पेपरफुटीची चौकशी सुरू असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच नीट सारखाच गडबड घोटाळा MH-CET परीक्षेतही झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम 35-40 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत 100 पर्सेंटाईल पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. सविस्तर वाचा
‘नीट’नंतर राज्यात MHT-CET मध्येही घोटाळ्याचा आरोप : बारावीत 40 टक्के अन् सीईटीत 99 पर्सेंटाईल कसे? शिक्षकाचा व्हिडिओतून गंभीर दावा

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या वादात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET 2026) परीक्षेत ‘नीट’पेक्षाही मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ समोर आणत परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “बारावीत जेमतेम पास झालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल कसे मिळाले?” या एका प्रश्नाने आणि पैशांचा वापर करून गुण वाढवल्याच्या दाव्याने सध्या राज्याच्या शिक्षण वर्तुळात भूकंप आणला आहे. सविस्तर वाचा…