![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित ढिसाळपणा, पेपरफुटी आणि निकालातील गोंधळाविरोधात आज पुण्यात एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांनी भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. ओंकारेश्वर मंदिर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. मोर्चामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि स्थानिक ठाकरे गटाचे शिवसेना नेते हे प्रामुख्याने सहभागी झाले. सरकारचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल मोर्चात सहभागी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. “मुलं रस्त्यावर उतरलेली असताना सरकारने त्यांचे ऐकून तरी घ्यायला हवे, चर्चेला बसायला हवे. विद्यार्थ्यांचा अर्धा वेळ अभ्यासिकेऐवजी रस्त्यावर आंदोलने करण्यात जात आहे, हे सरकारचे मोठे अपयश आहे,” असा घणाघात सुळेंनी केला. पेपरफुटीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “देशात ‘टोफेल’ आणि ‘जीआरई’ सारख्या परीक्षा होतात, तिथे पेपर फुटत नाहीत. एआय (AI) तंत्रज्ञान असतानाही पेपर फुटणे थांबत नाही, यावर माझा विश्वास नाही.” तसेच, देशात आणि राज्यात सुरू असलेल्या आर्थिक संकटावरून लक्ष विचलित करण्यासाठीच सरकार दोन धर्मांमध्ये भांडणे लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने हट्टीपणा सोडून जबाबदार व्यक्तीला पाठवून विद्यार्थ्यांशी चर्चा करावी आणि जंतर-मंतर सारखा उद्रेक टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. पाहा आंदोलनाचे फोटोज… रोहित पवारांचे अध्यक्षांवर गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्षांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी ट्विटद्वारे खालील मुद्दे मांडले. “डिपार्टमेंटल PSI परीक्षेत १५० जणांनी मास कॉपी केली असून, FDA पेपरफुटीत अवर सचिव अभिजित लेंडवेसारखे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी आहेत,” असा दावा पवार यांनी केला. “एमपीएससीच्या शुद्धीकरणाशिवाय हा लढा थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय? आक्रोश मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत प्रमुख मागण्या मांडल्या. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा देऊन स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. २०२२ पासून झालेल्या सर्व परीक्षांची आणि गट-ब परीक्षेतील आक्षेपांची चौकशी व्हावी. अटकेत असलेला अवर सचिव अभिजित लेंडवे याच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे, तसेच ‘डीआय’मधील संशयास्पद निकालांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडावी आणि लघुलेखक पद पुन्हा सुरू करावे. लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या नियुक्त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या उमेदवारांचे संपर्क तपासले जावेत. “एमपीएससीवर आमचा आई-वडिलांपेक्षा जास्त विश्वास होता, पण आता तो संपत चालला आहे. यापुढे पेपर फुटू नयेत म्हणून सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीने पेटला संताप एमपीएससीच्या औषध निरीक्षक गट-ब भरती परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण आंदोलनामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी आणि प्राथमिक चौकशीनंतर एमपीएससीने 25 ऑगस्ट रोजी ही भरती प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणात एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाल मराठे आणि विश्वेश्वर नखाते यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका कथितरीत्या परीक्षेपूर्वी काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या प्रकरणामुळे आयोगाच्या अंतर्गत यंत्रणेतूनच प्रश्नपत्रिका बाहेर गेली का, प्रश्नपत्रिका कोणाकडे पोहोचली, त्याचा लाभ कोणाला झाला आणि या प्रक्रियेत आणखी किती जण सहभागी आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तपासादरम्यान उच्च गुण मिळवलेल्या काही उमेदवारांचाही तपास यंत्रणांकडून तपास केला जात असल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांनी याच पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीला दिलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली आहे. एमपीएससी अध्यक्ष मुंगळ्यासारखे चिकटलेत यावेळी राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनीही सरकारवर निशाणा साधला. “विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे सरकार आंधळे आणि बहिरे झाले आहे. एका सेंटरवरून ८४ पैकी ५५ मुले पास होतात, हा मोठा घोटाळा आहे. नि:पक्ष चौकशी होईपर्यंत अध्यक्षांनी पदावरून बाजूला व्हायला हवे, पण ते गुळाला मुंगळा चिकटल्यासारखे पदाला चिकटून बसले आहेत,” अशी घणाघाती टीका शेख यांनी केली. आदित्य ठाकरे आणि अभिजित दिपके यांचा पाठिंबा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत मोर्चाला पाठिंबा दिला. “एमपीएससीमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. स्थानिक शिवसेना आणि युवासेना या मोर्चामध्ये सहभागी होईल,” असे ते म्हणाले. यासोबतच, कॉकर जनता पार्टीचे (CJP) अभिजित दिपके यांनीही ट्विट करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. हेही वाचा… धनंजय मुंडेंचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ चर्चेत: ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…’, राजकीय पुनरागमनाचे संकेत! मागील काही महिन्यांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कवितेच्या ओळींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत मुंडे यांचा बदललेला आणि अधिक तंदुरुस्त दिसणारा लूकही लक्ष वेधून घेत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा!:सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसह हजारो विद्यार्थी रस्त्यावर; सखोल चौकशीची मागणी