Headlines

NEET प्रकरणी सरकार गंभीर:फास्ट ट्रॅक कोर्टपासून विद्यार्थ्यांशी संवादापर्यंत मुरलीधर मोहोळांनी मांडली भूमिका, काँग्रेसवर टीकास्त्र




नीट पेपरफुटी प्रकरण, त्यानंतर झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि काँग्रेसची भूमिका यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक होत विरोधकांचा समाचार घेतला आहे. सरकारने पेपरफुटी प्रकरणात तातडीने सीबीआयची एसआयटी नेमली असून आतापर्यंत १३ जणांना गजाआड केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर मोहोळ यांनी टीका केली आहे. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काहीही देणेघेणे नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, असा घणाघात त्यांनी केला. कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांचे हित जपले पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “नीट पेपरफुटीनंतर देशाच्या विविध भागांतून १३ जणांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सीबीआयची एसआयटी नेमण्यात आली आहे. पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने परीक्षा रद्द करून अवघ्या ३७ दिवसांत ‘री-नीट’ (पुनर्परीक्षा) घेण्यात आली आणि २५ दिवसांत निकाल लावून प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. एका बाजूला गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि दुसरीकडे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी दुहेरी यंत्रणा सरकारने राबवली.” तरुणांचे भविष्य हीच सरकारची प्राथमिकता: फास्ट ट्रॅक कोर्टात खटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत मोहोळ म्हणाले, “देशातील विद्यार्थ्यांची स्वप्ने आणि त्यांचे भविष्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यापेक्षा दुसरा कोणताही विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. पेपरफुटी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. जे घडले ते दुर्दैवी होते, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही, मात्र सरकार तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असून सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसी कारवाईचीही सीबीआय चौकशी होणार आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईबाबत विचारले असता मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्याच्या विश्लेषणातून जे सत्य समोर येईल, त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल. राहुल गांधींच्या आंदोलनाचा तीव्र निषेध काँग्रेसने थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावर मोहोळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “एका जबाबदार राजकीय नेत्याने आणि पक्ष कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल. राहुल गांधींनी जे केले त्याचा मी तीव्र निषेध करतो. जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधींना वारंवार विनंती केली होती की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तुम्हाला जे बोलायचे आहे ते संसदेत बोला, आम्ही तुमचे ऐकू आणि त्याला उत्तरही देऊ. पण राहुल गांधी तसे करत नाहीत. त्यांना सभागृह चालू द्यायचे नाही आणि केवळ गोंधळ घालायचा आहे. मला वाटते की, काँग्रेसला आणि राहुल गांधींना विद्यार्थी, त्यांचे भविष्य आणि या परीक्षेशी काहीही देणेघेणे नाही.” हेही वाचा.. सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण सोडले: मंत्री नड्डा मध्यरात्री 12.30 वा. मेदांतात, ज्यूस पाजला; CJP समर्थकांनी बॅरिकेड्स तोडले, आंदोलन सुरूच पेपरफुटीविरोधात उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी २७ व्या दिवशी उपोषण सोडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी वांगचुक यांना सरबत पाजून त्यांचे उपोषण सोडवले. वांगचुक यांनी उपोषण संपवल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा रोहित पवारांचा पोलिसांच्या भूमिकेवर संताप:म्हणाले- अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR ची हिंमत दाखवली नाही, अन् विद्यार्थ्यांवर कारवाई? नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राज्यभरात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत पोलिसांच्या कारवाईला ‘दिल्लीच्या पोलिसांपेक्षाही क्रूर’ म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा ही दडपशाही सरकारच्या अंगलट येईल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *