पुण्यात 455 केक आणि कुकीजमधून भारतातील 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचा सांस्कृतिक वारसा साकारण्यात आला. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने या प्रदर्शनाची विश्वविक्रम म्हणून अधिकृत नोंद केली आहे. देशभरातील 36 कलाकारांनी यात सहभाग घेतला.
.
पुण्यातील रॉयल आयसिंग आणि वारसाकला कलाकार प्राची धाबल देब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. बाणेर-बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेलमध्ये प्रदर्शनाचे परीक्षण आणि प्रमाणीकरण झाले.
प्रदर्शनात कलाकारांनी तयार केलेले 75 केक आणि प्राची धाबल देब यांनी हाताने सजवलेल्या 380 रॉयल आयसिंग कुकीज मांडण्यात आल्या. 75 केकच्या माध्यमातून देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यात आले. कलाकृतींमध्ये प्रादेशिक सण, धार्मिक परंपरा, वास्तुकला, वस्त्रसंस्कृती, दागिने आणि लोककला दाखवण्यात आली.
‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या यूकेच्या संचालक डॉ. सुचिता शुक्ला आणि भारताच्या संचालक डॉ. प्रियांका शुक्ला यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. त्यांनी कलाकारांशी संवाद साधून कलाकृतींमागील संकल्पना आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेतले. अशा प्रकारचा प्रयत्न विश्वविक्रमासाठी प्रथमच करण्यात आल्याचे डॉ. सुचिता शुक्ला यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
केरळचा ओणम सण, उत्तर प्रदेशातील बरसाना आणि नंदगावची लठमार होळी, समुद्रमंथनाची पौराणिक संकल्पना, मेघालयातील जिवंत मुळांचे पूल आणि महाराष्ट्रातील पेशवाई विवाहपरंपरा केकच्या माध्यमातून साकारण्यात आल्या. प्राची यांनी तयार केलेल्या कुकीजमध्ये भारतीय हातमाग, पारंपरिक दागिन्यांच्या शैली आणि विविध प्रादेशिक नक्षीकाम दाखवण्यात आले.
प्राची धाबल देब म्हणाल्या, “भारताच्या सांस्कृतिक विविधतेशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कलाकारांनी आपापल्या प्रदेशाचा वारसा आपल्या दृष्टिकोनातून साकारला. सर्व कलाकृती एकाच दालनात पाहताना भारताकडे पाहण्याच्या अनेक वेगवेगळ्या दृष्टी अनुभवता आल्या.”
सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम मदत करतात, असे पवनीत कौर यांनी सांगितले. कार्यक्रमात प्राची यांच्या ‘Hands of Heritage’ आणि ‘Edible Loom’ या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे अनावरणही करण्यात आले.
प्राची धाबल देब यांच्या नावावर यापूर्वी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे तीन विक्रम आहेत. त्यात भारतीय वास्तुकला आणि जागतिक वारशापासून प्रेरित 100 आणि 200 किलो वजनाच्या खाद्यकलाकृतींचा समावेश आहे.



